प्रा. दीपक पवार यांच्यावरील आरोपांचा माकपकडून तीव्र निषेध;

सत्ताधाऱ्यांकडून कायद्यांचा गैरवापर, माकप ने केला आरोप

प्रतिनिधी | बुलडाणा
मराठी भाषा, रोजगार आणि अस्मितेच्या प्रश्नावर सातत्याने भूमिका मांडणारे मराठी अभ्यास केंद्राचे प्रा. दीपक पवार यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला असून, हा प्रकार सरकारकडून विरोधी आवाज दडपण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप पक्षाने केला आहे.
मराठीला राजभाषा व व्यवहारभाषा म्हणून बळकटी मिळावी, तसेच मराठी विषयक धोरणांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्रा. दीपक पवार यांनी दीर्घकाळ काम केले आहे. लोकभाषेच्या चळवळीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावत मराठीचा प्रश्न केवळ भाषिक न ठेवता तो रोजगार, अर्थकारण आणि सामान्यांच्या जगण्याशी निगडित असल्याचे ठामपणे मांडले आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केल्यामुळे त्यांना ‘अर्बन नक्षल’ ठरविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप माकपने केला आहे. हा प्रकार लोकशाही हक्कांवर गदा आणणारा असून, विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून कायद्यांचा गैरवापर होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
तसेच, राज्यात आणण्यात येणाऱ्या विविध कायद्यांच्या माध्यमातून सरकारविरोधी मतप्रवाह दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही पक्षाने नमूद केले. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या घोषणांमागे प्रत्यक्षात मराठीला दुय्यम स्थानावर ठेवण्याचे राजकारण दडलेले असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
दरम्यान, प्रा. दीपक पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे स्पष्ट करत, मराठीसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या कारवाईला माकपकडून तीव्र विरोध केला जाईल, असा इशाराही पक्षाने दिला आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!