मुंगी हवी आहे! एका मुंगीसाठी मोजा २२ हजार रुपये
जायंट आफ्रिकन हार्वेस्टर मुंगीला पाळीव बनवण्याचे वाढते क्रेझ

प्रतिनिधी | दिल्ली
आजपर्यंत लोकांनी कुत्रे, मांजरी, पक्षी यांसारखे पाळीव प्राणी ठेवण्याचा ट्रेंड पाहिला असेल, पण आता पाळीव प्राण्यांच्या यादीत एका वेगळ्याच जीवाची भर पडली आहे मुंगी! विशेषतः जायंट आफ्रिकन हार्वेस्टर या प्रजातीच्या मुंगीची तस्करी जगभरात होत असल्याने ही सध्या प्रचंड चर्चेत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काचेच्या पारदर्शक पेटीत या मुंग्यांचं स्वतःचं साम्राज्य कसं उभं राहतं, हे पाहण्यासाठी लोक वेडे होत आहेत आणि याच छंदापोटी या मुंग्यांची तस्करी केली जातेय. यासाठी एका राणी मुंगीसाठी तब्बल २१ हजार रुपये सुध्दा देण्यास लोक तयार आहे.
केनियाच्या रिफ्ट व्हॅलीमध्ये ‘गिलगिल’ नावाचं एक साधं, शांत आणि शेतीप्रधान शहर आहे. सध्या केनियामध्ये पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे तिथल्या हजारो वारुळांमधून या मुंग्या बाहेर पडतायत. या मुंग्यांच्या प्रजननाच्या काळात पंख असलेले नर आणि राणी मुंग्या वारुळातून बाहेर पडून हवेत उडतात. हीच वेळ हेरून तस्कर या राणी मुंग्यांना पकडतात. या मुंग्या पुढे अशा टोळ्यांना विकल्या जातात, ज्या एका मोठ्या आंतरराष्ट्रीय तस्करीचा काळाबाजार करतात.
एका गर्भवती राणी मुंगीत इतकी क्षमता असते की, ती एकटीच मुंग्यांचं संपूर्ण साम्राज्य उभं करू शकते. विशेष म्हणजे या राणी मुंग्या काही वर्षं नव्हे, तर चक्क अनेत दशकं जगू शकतात. या तस्करीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे या मुंग्यांना पोस्टाद्वारे अगदी सहजपणे कुठेही पाठवता येतं. याचं कारण असं की, विमानतळांवर किंवा कुरिअर सेंटर्सवर असणारे स्कॅनर्स सहसा अशा सेंद्रिय पदार्थांना ओळखू शकत नाहीत. त्यामुळे कोणत्याही तपासणीविना या मुंग्यांची जगभर तस्करी करणं तस्करांना अगदी सोपं झाल आहे.



