हजारो नागरिकांना मिळणार हक्काचा निवारा; आमदार गायकवाड यांचे भगीरथ प्रयत्न

बुलढाणा :
बुलढाणा शहर तसेच ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांना आता हक्काच्या निवाऱ्याची आशा निर्माण झाली आहे. निवासी अतिक्रमणे नियमाकुल करण्यासाठी आमदार संजय गायकवाड यांनी प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा करत भगीरथ प्रयत्न सुरू ठेवले असून, या प्रक्रियेमुळे पात्र नागरिकांना कायदेशीर हक्कासह शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
अनेक वर्षांपासून शासकीय जमिनीवर वास्तव्यास असलेल्या हजारो कुटुंबांना हक्काचा निवारा मिळावा, त्यांना कायदेशीर संरक्षण मिळून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता यावा, यासाठी आमदार संजुभाऊ गायकवाड सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे आणि प्रशासनाशी साधलेल्या समन्वयातून आता पात्र नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावेळी आमदार गायकवाड यांनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश देत सर्वसामान्यांच्या घराचा प्रश्न अत्यंत संवेदनशील असल्याचे सांगितले. पात्र नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी नियमाकुल प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. अनेक कुटुंबांनी वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या जागांवर आता कायदेशीर हक्क प्राप्त होणार असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. बैठकीत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. तसेच पुढील टप्प्यातील नियोजन, आवश्यक कागदपत्रे, पात्रता निकष आणि प्रलंबित प्रकरणांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या संयुक्त प्रयत्नांतून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक पावले उचलली जात असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
या बैठकीस उपविभागीय अधिकारी शरद पाटील, नगराध्यक्ष पूजाताई संजय गायकवाड, तहसीलदार विठ्ठल कुमरे, नगरपरिषद मुख्याधिकारी गणेश पांडे, नगरपालिकेचे गटनेते मृत्युंजय संजय गायकवाड, उपाध्यक्ष गजेंद्र दांदडे, विविध विभागांचे अधिकारी, नगरसेवक, नगरसेविका तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वसामान्य नागरिकांच्या घराच्या प्रश्नासाठी आमदार संजुभाऊ गायकवाड यांनी केलेल्या भगीरथ प्रयत्नांमुळे आता हजारो गरजू कुटुंबांना हक्काच्या निवाऱ्याचा मार्ग मोकळा होण्याची आशा निर्माण झाली आहे.




