घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास रेती मिळणार मोफत; ९ जूनपर्यंत लाभ घेण्याचे तहसीलदार भूषण पाटील यांचे आवाहन

लोणार,
प्रधानमंत्री आवास योजना तसेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी शासनाने महत्त्वपूर्ण सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पात्र लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी पाच ब्रास रेती विनामूल्य देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, इच्छुकांनी ९ जूनपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत, असे आवाहन तहसीलदार भूषण पाटील यांनी केले आहे.
महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार लोणार तालुक्यातील सावरगाव तेली-अ, सावरगाव तेली, चांगेफळ, भुमराळा, खापरखेड लाड-अ आणि खापरखेड या रेती घाटांमधून रेतीचा पुरवठा केला जाणार आहे. संबंधित घाटांचा लिलाव पूर्ण झाल्याने तेथून रेती वाहतुकीची प्रक्रिया सुरू आहे. घरकुल लाभार्थ्यांना जास्तीत जास्त पाच ब्रास रेती मोफत दिली जाणार असून, वितरण ‘आधी अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर करण्यात येईल. मात्र, रेती घाटापासून बांधकामस्थळी पोहोचविण्याचा खर्च लाभार्थ्यांनाच करावा लागणार आहे. रेती मंजुरीसाठी घरकुलाचा अधिकृत आराखडा व इतर आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. लाभार्थ्यांची माहिती ऑनलाइन प्रणालीमध्ये उपलब्ध असल्याने कागदपत्रांची पडताळणी आणि ओटीपी प्रमाणीकरणानंतर मंजुरीची प्रक्रिया तातडीने पूर्ण केली जात आहे.
योजनेचा लाभ घेताना कोणत्याही मध्यस्थांवर अवलंबून न राहता थेट प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसील प्रशासनाने केले आहे. लाभार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी लोणार तहसील कार्यालयात विशेष कक्ष सुरू करण्यात आला असून अधिक माहितीसाठी संबंधित मंडळ अधिकारी कार्यालय अथवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




