देऊळघाटच्या पाणीप्रश्नी आमदार संजुभाऊ गायकवाड आक्रमक

दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे प्रशासनाला निर्देश

बुलढाणा

    तालुक्यातील देऊळघाट येथे तीव्र होत चाललेल्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर अखेर प्रशासन हलले असून संजुभाऊ गायकवाड यांनी बुधवार 3 जून रोजी सकाळी १० वाजता गावात प्रत्यक्ष भेट देत अधिकाऱ्यांची तातडीची आढावा बैठक घेतली. नागरिकांना पाण्यासाठी होणारा त्रास त्वरित कमी करण्यासाठी पुढील दोन दिवसांत प्रभावी उपाययोजना राबविण्याचे आदेश त्यांनी संबंधित विभागाला दिले. 

  बैठकीदरम्यान गावातील सध्याच्या पाणीपुरवठा व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. अनेक भागांमध्ये पाणीअभावी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहिती ग्रामस्थांनी आमदार गायकवाड यांच्यासमोर मांडली. यानंतर पुढील दोन दिवसांत गावातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.  यावेळी पाणीपुरवठा योजने अंतर्गत सुरू असलेल्या तसेच विविध कारणांमुळे रखडलेल्या कामांचाही आढावा घेण्यात आला. नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित कंत्राटदारांना देण्यात आले. कामांमध्ये निष्काळजीपणा अथवा विलंब सहन केला जाणार नसल्याचा इशाराही आमदार गायकवाड यांनी दिला. 

   यावेळी बैठकीस महाराष्ट्र जल जीवन प्राधिकरण, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, कार्यकारी अभियंता, शाखा अभियंता, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच यांच्यासह विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच ग्रामस्थ, शिवसैनिक आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या मांडल्या.  यावेळी बोलताना आमदार संजुभाऊ गायकवाड म्हणाले, “पाणी हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असून नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागू नये, ही प्रशासनाची जबाबदारी आहे. देऊळघाट येथील पाणीटंचाई दूर करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील.”

दरम्यान, पाणीप्रश्नी प्रत्यक्ष गावात येऊन बैठक घेतल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार गायकवाड यांचे आभार मानले. या बैठकीनंतर देऊळघाटच्या पाणीटंचाईच्या समस्येवर लवकरच मार्ग निघेल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!