मोताळा तळयात की मळयात? फैसला ९ जुलै
खामगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात

बुलडाणा
प्रस्तावित खामगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्थापनेची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून, या नव्या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात जिल्ह्यातील घाटाखालील सात तालुक्यांचा समावेश करण्यात येणार आहे. यात मोताळाचा ही समावेश आहे. या संदर्भात राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने यासंदर्भात परिपत्रक जारी करून हरकती व सूचना मागविण्याचे निर्देश देण्यात आले होते. या हरकती साठी १ जुलै पर्यतची मुदत देण्यात आली आहे. या निर्णयात मोताळा तळयातच राहातो की, मळयात जातो या बाबत मोताळा तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना चिंता लागली आहे. परिणामी बुलडाणा मतदार संघातील सर्वच नागरिकांच्या नजरा या प्रस्तावाकडे लागल्या आहे.
मागील अनेकवर्षापासून खामगाव हा जिल्हा व्हावा अशी मागणी जिल्हयातील नागरिकांची आहे. शासनाच्यावतीने मतदार संघाची पुर्नरचना होणार असल्याने अनेक जिल्हयाची सीमा मर्यादा वाढवली जाणार आहे. अनेक ठिकाणी नवे तालुके जाहिर केले जाण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी नवीन जिल्हयाची ही शक्यता आहे. याच धरतीवर खामगाव देखील जिल्हयाच्या हालचालींना वेग आल्याचे चित्र आहे. प्राथमिकस्तरावर शासनाच्यावतीने खामगाव या ठिकाणी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहे. या आदेशाच्या अनुशंगाने प्रशासकिय कार्यवाहीला वेग आला आहे. या प्रस्तावित कार्यक्षेत्रानुसार मोताळासह खामगाव, शेगाव, मलकापूर, नांदुरा, संग्रामपूर आणि जळगाव जामोद हे सात तालुके खामगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारित येणार असल्याची माहिती आहे. मोताळा हा बुलडाणा मतदार संघाशी जोडलेला आहे, त्यामुळे मोताळा तालुक्यात विविध स्वरुपाची चर्चा आहे.
या प्रकरणीराज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने यासंदर्भात परिपत्रक जारी करत हरकती व सूचना मागविण्याचे निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील घाटाखालील सर्व तालुके एकाच प्रशासकीय छत्राखाली आणण्याचा हा प्रयत्न मानला जात आहे. शासनाने या प्रस्तावाबाबत स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी व संबंधित घटकांकडून हरकती आणि सूचना मागविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी जाहीर सूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.
१ जुलै पर्यत विभागीय आयुक्त शासनाला पाठवणार अभिप्राय
खामगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रस्तावाबाबत स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी आणि संबंधित घटकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. या संदर्भात प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचनांचे दैनंदिन संकलन व विश्लेषण करून जिल्हा प्रशासन स्वतः अभिप्राय तयार करणार आहे. हा अभिप्राय विभागीय आयुक्त यांना पाठवला जाणार आहे. आयुक्ता मार्फत सदर अहवाल १ जुलै २०२६ पर्यंत शासनाकडे केला जाणार आहे.
सर्वच गणित बदलणार
मोताळा तालुका हा बुलडाणा विधानसभा मतदार संघाशी जोडलेला आहे. या तालुक्यावर शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचे वर्चस्व आहे. हा परिसर त्यांचा गठठा मतदार समजला जातो. मोताळा तालुक्यातला खामगाव कार्यालयाशी जोडले गेले तर भविष्यात हा तालुका खामगाव जिल्हयात समावेश केला जाईल. परिणामी बुलडाणा विधानसभा मतदार संघाची फाळणी झाली तर आपोआपच मतदार संघाच्या सीमामर्यादा ही बदलतील. मतदार ही बदलेल व नेतृत्व ही बदलेल. पर्यायाने भविष्यातील सर्वच गणित बिगडतांना दिसत आहे, त्यामुळे या विषयी काय निर्णय होतो, हे जाणून घेण्यासाठी परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांत प्रचंड उत्सुकता लागली आहे.
घाटाखाली, घाटावरी होणार विभागणी
प्रस्तावित रचनेनुसार बुलडाणा, चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, मेहकर आणि लोणार हे सहा तालुके विद्यमान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या थेट कार्यक्षेत्रात राहणार आहेत. उर्वरित तालुके हे खामगाव कार्यालयाशी संबंधित राहतील. या विभागणीमुळे नागरिकांची कामे वेगाने मार्गी लागतील. अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण देखील कमी होणार आहे.




