बीडीसीसीची अंतिम मतदार यादी जाहिर; पाठबळासाठी मुख्यमंत्र्याला साकडे
सहकार क्षेत्रावर ताबा मिळवण्यासाठी दोन्ही आरोग्यमंत्री लंगोट बांधून आखाड्यात

बुलडाणा
जिल्ह्यात शेतकऱ्यांचा श्वास समजली जाणारी व सहकार क्षेत्राची प्रतिष्ठा म्हणून ओळखली जाणारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक शासकिय मदतीच्या आधारे का होईना पुन्हा उभी राहली आहे. १४ वर्षाच्या पश्चात या बँकेत पुन्हा एकदा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सहकार व राजकारणासाठी महत्वाची समजल्या जाणाऱ्या या बॅकेवर झेंेडा फडकवण्यासाठी आजी व माजी मंत्र्यांत चुरस लागली आहे. एवढेच नाही तर सदर क्षेत्रावर आपले वर्चस्व निर्माण व्हावे यासाठी थेट मुख्यमंत्र्याला सुध्दा साकडे घातले गेल्याची चर्चा आहे.
जिल्ह्याच्या सहकार व राजकारण क्षेत्रावर जिल्हा सहकारी बँकेचा दबदबा होता. सदर बँक डबघाईस आल्याने जिल्हयातील शेतकऱ्यांची अवस्था हवालदिल झाली होती. सदर बँक प्रशासकाने कष्टाने सदर बँकेला पुन्हा उभारी दिली आहे. आता ही बँक सुमारे २३.५५ कोटी रुपयांच्या नफ्यासह उभी राहली आहे. त्यामुळे आता या बँकेत एवढे बळ आले की ही बँक पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे उंच आकाशात झेप घेवू पाहत आहे. त्यापुर्वी आता सदर बँकेत तब्बल १४ वर्षानंतर पुन्हा एकदा निवडणूक घेतली जाणार आहे. यातून एकूण २१ संचालकांची निवड केली जाणार आहे. सदर निवडणूकीची तयारी प्रशासकिय पातळीवर जोराने सुरु आहे. दुसरीकडे या बँकेवर सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा एकदा जिल्हयातील दिग्गजांच्या नजरा लागल्या आहे. यात विद्यमान केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव माजी आरोग्यमंत्री राजेंद्र शिंगणे यांचा नावाची चर्चा जोर पकडत आहे. काही दिवसापूर्वी माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची खटाटोप केला होता. याची भनक लागताच जिल्ह्यात शिंगणे हे भाजप मध्ये प्रवेश करणाऱ्या असल्याचा चर्चा सुरु झाल्या होत्या, तर पक्षाच्या वतीने बँकेला पाठबळ देण्याची मागणी करण्यासाठी आपण मुंबईला आलोय, पक्ष प्रवेशासाठी नाही असा खुलासा शिंगणे यांनी केला होता.
दुसरीकडे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे वरिष्ठ स्तरावर दुसऱ्या मार्गाने रसद मिळवण्याच्या तयारी असल्याची माहिती आहे. परिणामी निवडणूकीच्या काळात पुन्हा दोन दिग्गजांत सत्ता काबिजकरण्याचा संघर्ष घडतो की, संधीचा फायदा घेत दोघे दिग्गज हात मिळवणी करुन सत्ता स्थापन करतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे.
अंतिम मतदार यादी जाहिर
जिल्हयातील जिल्हा सहकारी बॅकेच्या निवडणूक संदर्भात विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, अमरावती यांनी यापूर्वीच प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. त्यावर हरकतींची मुदत संपली आहे. जिल्हा सहकारी बॅँकेच्या निवडणूकीत जिल्हयातील सुमारे १९०० पतसंस्था सहभागी होणार आहेत. सदर पतसंस्था या बॅकेतील २१ संचालकांची निवड करणार आहे. या निवडणूक कार्यक्रमाच्या अनुशंगाने ३ जुलै रोजी सायंकाळी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे आता या निवडणूकीसाठी लवकचर उमेदवारी अर्ज उपलब्ध केले जाणार आहे.
स्थानिक स्वराज संस्थेची रंगीत तालीम
जिल्हा सहकारी बॅकेत होणाऱ्या निवडणूकीत सात ही मतदार संघातील विद्यमान आमदार प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी होणार आहे. निवडल्या जाणाऱ्या २१ संचालकाच्या माध्यमातून अध्यक्षांची निवड होणार आहे. त्यामुळे पुढील काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणूकीसाठी सदर निवडणुक ही सर्वच पक्षासाठी रंगीत तालीम ठरणार आहे.




