भगवान महावीर की जयच्या गगनभेदी जयघोषात लोणार नगरी दुमदुमली

प. पू. किरणसुधाजी म. सा. यांचा ऐतिहासिक ‘आत्मोत्सव चातुर्मास’ प्रारंभ

लोणार
वरुणराजाच्या जलाभिषेक व जैन धर्मियांचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयघोषाने लोणार नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली. परमपूज्य किरणसुधाजी महाराज यांच्या पावन सान्निध्यात ऐतिहासिक ‘आत्मोत्सव चातुर्मास’ सोहळ्याचा उत्साहात शुभारंभ झाला. यावेळी शहरातून काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेत हजारो श्रावक-श्राविका सहभागी झाले होते. संपूर्ण परिसर “भगवान महावीर की जय”च्या गगनभेदी घोषणांनी दुमदुमून गेला आणि धार्मिक उत्साहाचे अनोखे दर्शन घडले.
या सोहळयाचे आयोजन वर्धमान जैन स्थानकवासी श्रावक संघाच्या वतीने आयोजित क रण्यात आला आहे. यासाठी महाराष्ट्र प्रवर्तनी परम पूज्य प्रभाकवरजी म.सा. यांची सुशिष्या करुणामुर्ती पैसठीया छंद आराधिका परम पूज्य किरणसुधाजी म. सा.तेला तप आराधिका पूज्य श्री विशालप्रभाजी म. सा आदि ठाणा ५ यांचा पवित्र ‘आत्मोत्सव चातुर्मास’ मंगल प्रवेश सोहळा भक्ती आणि निसर्गाच्या अभूतपूर्व संगमात झाला. दरम्यान शहरात मंगळवार पासून वरुणराजाने संततधार सुरू ठेवली होती. रात्रभर पडणाऱ्या या मुसळधार पावसामुळे संपूर्ण वातावरणात आल्हाददायक गारवा पसरला होता. सकाळी सोहळ्यादरम्यानही हा पाऊस रिमझिम रूपाने सुरू राहिल्याने जणू काही निसर्गानेच या पवित्र चातुर्मासाला जलाभिषेक केला. पावसाळ्यात सूक्ष्म जीवांची मोठ्या प्रमाणावर होणारी उत्पत्ती लक्षात घेऊन त्यांच्या रक्षणासाठी आणि अहिंसा व्रताच्या पालनासाठी जैन साधू-संत आपला पायी विहार थांबवून चार महिने एकाच ठिकाणी स्थिर राहतात. याच अनुषंगाने शहरात काढण्यात आलेल्या भव्य स्वागत मिरवणुकीत “भगवान महावीर की जय” अशा गगनभेदी जयघोषात, भजनी मंडळ,डोक्यावर अक्षता कलश घेतलेल्या सुवासिनी, पांढऱ्या शुभ्र वेशभूषेतील श्रावक आणि हातात धार्मिक ध्वज घेतलेले तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने प्रवेशावेळी विश्रांती घेतल्याने भक्ताचा आनंद द्विगुणित झालेला दिसला.ओल्या रस्त्यांची अजिबात पर्वा न करता, अबालवृद्ध भाविक भक्तीच्या रंगात न्हाऊन निघत अत्यंत उत्साहाने मिरवणुकीत पुढे चालत राहिले.

चार महिन्यांची आध्यात्मिक पर्वणी; ‘आत्मोत्सवा’त विविध धार्मिक उपक्रम
परमपूज्य किरणसुधाजी म. सा., तप आराधिका पूज्य विशालप्रभाजी म. सा. तसेच आदि ठाणा-५ यांचे लोणार येथील धीरज भवन (गेलडा भवन) येथे चार महिन्यांचे चातुर्मास वास्तव्य होणार आहे. या कालावधीत स्थानिक श्रावक-श्राविकांना नियमित प्रवचने, स्वाध्याय, ध्यान, धर्मचर्चा आणि आध्यात्मिक मार्गदर्शनाचा लाभ मिळणार आहे. आत्मकल्याणाचा संदेश देणाऱ्या या चातुर्मासाला ‘आत्मोत्सव’ असे नाव देण्यात आले असून, उपवास, एकासन, तप, संयम आणि आत्मशुद्धीच्या विविध धार्मिक आराधनांद्वारे भाविकांना आध्यात्मिक उन्नतीची संधी उपलब्ध होणार आहे.

चातुर्मास यशस्वीतेसाठी विविध मंडळांचे विशेष योगदान
लोणार येथे ऐतिहासिक ‘आत्मोत्सव चातुर्मास’ आयोजित करण्यासाठी वर्धमान जैन स्थानकवासी श्रावक संघासह प्रभा बहू मंडळ, जिनेश्वर युवा ग्रुप, चैतन्य भक्ती मंडळ आणि गुरु गणेश मिश्री वर्ल्ड ग्रुप यांच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. लोणार नगरीत चातुर्मास करण्याची श्रावकांची विनंती स्वीकारल्याबद्दल सर्व भाविकांनी परमपूज्य किरणसुधाजी म. सा. यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. गुरूंच्या पावन सान्निध्यामुळे लोणारच्या धार्मिक व आध्यात्मिक परंपरेत एक ऐतिहासिक पर्व जोडले गेल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!