‘पुस्तकवारी’ उपक्रमाला बालसाहित्यिक सुभाष किन्होळकर यांची साथ; ज्ञानदानासाठी नागरिकांना आवाहन
नवयुवक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, पान्हेराचा अभिनव उपक्रम; ग्रामीण शाळांच्या ग्रंथालयांसाठी पुस्तक संकलन

मोताळा
समाजोपयोगी उपक्रमांसाठी जिल्हाभरात वेगळी ओळख निर्माण केलेल्या नवयुवक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, पान्हेरा यांच्या “पुस्तकवारी – भक्तीची वाट… ज्ञानाची साथ!” या अभिनव उपक्रमाला सुप्रसिद्ध लेखक व बालसाहित्यिक सुभाष किन्होळकर यांनी उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविला. उपक्रमात प्रत्यक्ष सहभागी होत त्यांनी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक पुस्तके व शैक्षणिक साहित्य भेट दिले. तसेच नागरिक, शिक्षक, विद्यार्थी, लेखक, साहित्यप्रेमी आणि पुस्तकप्रेमींनी या ज्ञानदान अभियानात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
गेल्या अनेक वर्षांपासून नवयुवक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, पान्हेरा हे मंडळ केवळ गणेशोत्सवाचे आयोजन न करता विविध समाजोपयोगी उपक्रमांद्वारे सामाजिक बांधिलकी जपत आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव, शाडू मातीच्या मूर्तींचा वापर, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिरे, व्यसनमुक्ती जनजागृती, विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन, निबंध-वक्तृत्व स्पर्धा, शैक्षणिक साहित्य वितरण तसेच स्थानिक कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारे विविध सांस्कृतिक उपक्रम मंडळ सातत्याने राबवत आहे. या समाजाभिमुख कार्याची दखल घेत मंडळाला जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचा बहुमानही प्राप्त झाला आहे. याच सामाजिक परंपरेला पुढे नेत यंदा आषाढी वारीच्या पवित्र निमित्ताने “पुस्तकवारी – भक्तीची वाट… ज्ञानाची साथ!” हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत नागरिकांकडून संकलित होणारी नवीन अथवा सुस्थितीतील पुस्तके परिसरातील गरजू ग्रामीण शाळांच्या ग्रंथालयांना भेट म्हणून दिली जाणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविणे आणि ज्ञानाची गोडी निर्माण करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे मंडळाने सांगितले.
यावेळी बोलताना बालसाहित्यिक सुभाष किन्होळकर म्हणाले, “ज्ञानदान हेच खरे महादान आहे. प्रत्येकाने आपल्या घरातील नवीन किंवा चांगल्या स्थितीतील पुस्तके दान करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हातभार लावावा.”
मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सुभाष किन्होळकर यांचे आभार मानत, समाजातून मिळणारा वाढता प्रतिसाद ज्ञानदानाच्या या चळवळीला अधिक बळ देईल, असा विश्वास व्यक्त केला.




