लोणार-वडगाव तेजन मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक; चार युवक जखमी
खामगावच्या दोघांची प्रकृती चिंताजनक; अवघ्या ७ किमी अंतरासाठी रुग्णवाहिकेला तासभर विलंब झाल्याचा नागरिकांचा आरोप

वडगाव तेजन
लोणार-वडगाव तेजन मार्गावर शुक्रवार सकाळी १० वाजताच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत चार युवक जखमी झाले असून त्यापैकी खामगाव येथील दोन युवकांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोटरसायकल क्रमांक MH 28 K 2858 ही खामगावकडून लोणारच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या MH 28 AR 2458 या दुचाकीला तिची धडक झाली. या अपघातात दोन्ही दुचाकींवरील चार युवक जखमी झाले. त्यापैकी एका युवकाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून शारा येथील दोन युवकांच्या हात-पायांना मार लागल्याची माहिती आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांच्या तपासानंतर त्याबाबत अधिक माहिती समोर येणार आहे.
अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी जखमींना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. मात्र, नागरिकांच्या म्हणण्यानुसार रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचण्यासाठी तब्बल तासभर लागला. विशेष म्हणजे, अपघाताचे ठिकाण लोणारपासून वडगाव तेजनच्या दिशेने अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे गंभीर जखमींना वेळेत उपचार मिळण्याच्या दृष्टीने रुग्णवाहिका सेवेच्या तत्परतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
रुग्णवाहिका त्या वेळी नेमकी कुठे होती, आपत्कालीन कॉल मिळाल्यानंतर ती घटनास्थळी रवाना होण्यासाठी किती वेळ लागला आणि प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचण्यास विलंब का झाला, याची प्रशासनाने चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. गंभीर अपघातांमध्ये प्रत्येक मिनिट महत्त्वाचे असल्याने ग्रामीण भागातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि तत्पर करण्याची गरज या घटनेमुळे पुन्हा अधोरेखित झाली आहे.
दरम्यान, अपघातातील चारही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून खामगाव येथील दोन्ही युवकांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे.




