तत्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करा; किसान सन्मान निधीत वाढ करा

धामणगाव बढे | सादिक बिस्मिल्लाह शेख
मोताळा तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम धोक्यात आला असून शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने तालुक्यात तत्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या हप्त्यात वाढ करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली.
या मागण्यांसाठी धामणगाव बढे येथील शिवसेना (उबाठा) पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोताळा तहसीलदार यांच्यासाठी मंडळ अधिकाऱ्यांमार्फत तलाठी जाधव यांच्याकडे निवेदन सादर केले. पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम झाला असून, आगामी काळात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती आणखी बिकट होण्यापूर्वी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
पावसाअभावी शेतीचा उत्पादन खर्चही वसूल होण्याची परिस्थिती नसताना शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या हप्त्यात वाढ करणे गरजेचे असल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी म्हटले. दुष्काळसदृश परिस्थितीची तातडीने पाहणी करून शेतकऱ्यांना आवश्यक मदत व सवलती उपलब्ध करून द्याव्यात, अशीही मागणी करण्यात आली.
यावेळी उबाठा गटाचे शहरप्रमुख रामशंकर सोनवणे, उपतालुकाप्रमुख मुकुंदा माळी, संघटक राजू बोरसे, बबुलू लेणेकर, शालिग्राम गोरे, डॉ. दिलीप उबाळे, रशिदखा पठाण, श्रीकृष्ण भोरे, गफार कोतवाल, मुक्तार पठाण, धोंडूबा गोरे, मंजूर पटेल, रवी वाघ, मोहन बावस्कर, शाम गोरे, धनराज उबाळे, खलील पटेल यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते




