बसस्थानक परिसरातून गाय चोरी; सीसीटीव्हीमध्ये घटना कैद, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

- https://youtu.be/THQV4Tm0YeY
धामणगाव बढे | सादिक बिस्मिल्लाह शेख
धामणगाव बढे परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, धामणगाव बढे बसस्थानक परिसरातून मध्यरात्री एका गाय चोरीला गेल्याची घटना 17 सप्टेंबर रोजी उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, 17 सप्टेंबरच्या मध्यरात्री सुमारे 1.30 वाजताच्या दरम्यान दोन ते तीन अज्ञात व्यक्तींनी इंडिका कारचा वापर करून धामणगाव बढे बसस्थानक परिसरातून अंदाजे 14 ते 15 हजार रुपये किमतीची गाय चोरून नेल्याचे समोर आले आहे. सदर गाय धामणगाव बढे येथील माजी उपसरपंच श्याम निमखेडे यांची असल्याची माहिती आहे. या चोरीच्या घटनेचा प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये इंडिका कारमधून गाय नेताना काही व्यक्ती दिसत असल्याचे सांगण्यात येत आहे. सदर व्हिडिओ आज सकाळपासून विविध व्हॉट्सॲप ग्रुपवर मोठ्या प्रमाणात शेअर होत असून, त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आणखी दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गाय चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर श्याम निमखेडे यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, धामणगाव बढे परिसरात यापूर्वीही चोरीच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, पोलिस प्रशासनाने परिसरात रात्रीची गस्त वाढवून चोरीच्या घटनांना आळा घालावा आणि अज्ञात चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.



