गणरायाच्या साक्षीने ‘राजर्षी शाहू’ मंडळाचा आरोग्यसेवेचा उपक्रम
मोफत आरोग्य तपासणी शिबिरात सुमारे २०० नागरिकांची तपासणी

बुलडाणा
गणेशोत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड देत राजर्षी शाहू गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कारंजा चौक नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र व राजर्षी शाहू गणेशोत्सव मंडळाच्या संयुक्त विद्यमाने २२ सप्टेंबर रोजी झालेल्या या शिबिरात सुमारे २०० नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेतली.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या उपक्रमाचे आयोजन राजर्षी शाहू परिवाराचे संस्थापक अध्यक्ष संदीप शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत व संस्थेच्या अध्यक्षा मालती शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सकाळी भक्तिमय वातावरणात ॲड. केशव पाठक, डॉ. विजय परिहार, संगीता परिहार, पुंडलिक नागपुरे, यमुना नागपुरे व दिगंबर दळवी यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली. यानंतर श्री गणरायाचे पूजन तसेच छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पूजनानंतर मोफत आरोग्य शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. शिबिरात नागरिकांची आवश्यक आरोग्य तपासणी करून त्यांना वैद्यकीय मार्गदर्शन व आरोग्यविषयक सल्ला देण्यात आला. गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबवून ‘सेवा हीच खरी भक्ती’ हा संदेश देण्याचा प्रयत्न मंडळाच्या वतीने करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा राजर्षी शाहू गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता बडगे, जिल्हा विस्तार अधिकारी डॉ. राजेश दुतडमल, जिल्हा सुसृषा अधिकारी डॉ. अनंत वायझडे, जिल्हा माहिती अधिकारी सतीश बघमरे, राजर्षी शाहू मल्टीस्टेटचे सरव्यवस्थापक दिलीप चव्हाण, मंडळाचे अध्यक्ष सुभाष बुंधे, सुशील गुळवे, पवन सावळे, प्रीती सावळे, राजाराम तायडे, कृष्णा सावळे, पंडितराव गव्हाळे, संदीप टेकाळे, मंगेश भोंडे, पवन हिवाळे, अमोल सुसर यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी, राजर्षी शाहू परिवारातील सदस्य, संस्थेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सेवा हीच खरी भक्ती’चा संदेश
गणेशोत्सव म्हटले की धार्मिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक उपक्रमांनाही महत्त्व दिले जात आहे. राजर्षी शाहू गणेशोत्सव मंडळाने याच भावनेतून आरोग्य शिबिराचे आयोजन करून गणरायाच्या उत्सवाला सामाजिक सेवेची जोड दिली. नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना वैद्यकीय मार्गदर्शन देण्यात आले. त्यामुळे उत्सवाच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्याचा संदेश देण्यात आला.
सुमारे २०० नागरिकांनी घेतला लाभ
मोफत आरोग्य तपासणी शिबिरात शहरातील सुमारे २०० नागरिकांनी सहभाग नोंदविला. आरोग्य विभागाच्या पथकाने नागरिकांची आवश्यक तपासणी करून त्यांच्या आरोग्यविषयक तक्रारी जाणून घेतल्या. त्यानुसार डॉक्टरांकडून आवश्यक वैद्यकीय सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले. उत्स्फूर्त प्रतिसादामुळे शिबिराचा उद्देश मोठ्या प्रमाणात सफल झाल्याचे दिसून आले.




