सोयाबीनची करपलेली झाडे हातात घेऊन शेतकऱ्यांची तहसीलवर धडक

लोणारमध्ये अभूतपूर्व एल्गार; शेतकऱ्यांच्या सुपुत्रांनी केले नियोजन, तालुक्यातील सर्वात मोठा मोर्चा

लोणार | गोपाल तोष्णीवाल

 

पावसाने प्रदीर्घ दडी मारल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील करपलेली सोयाबीनची झाडे हातात घेत संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी लोणार तहसील कार्यालयावर धडक देत जोरदार एल्गार केला. तालुक्यातील गावागावांतून हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. लोणार तालुक्याच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा शेतकरी मोर्चा असल्याचा दावा आंदोलकांनी केला.

या मोर्चाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यामागील संपूर्ण नियोजन शेतकऱ्यांच्या तरुण मुलांनी केले. कोणत्याही राजकीय पक्षाचे नेतृत्व न घेता गावागावांतील तरुणांनी शेतकऱ्यांशी संपर्क साधला. प्रत्येक गावातून शेतकऱ्यांना लोणार येथे आणण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यापासून ते मोर्चाची आखणी आणि नियोजनापर्यंतची जबाबदारी या तरुणांनी पार पाडली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांच्या मुलांनी पुढाकार घेतल्याने या आंदोलनाची तालुक्यात चर्चा झाली.

पावसाच्या खंडाने सोयाबीन करपले

लोणार तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात पावसाने मोठा खंड दिल्याने पिकांची अवस्था गंभीर झाली आहे. तालुक्याचे प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनवर याचा मोठा परिणाम झाला असून अनेक भागांत पिके शेतातच करपून गेली आहेत. कपाशी, तूर आणि इतर खरीप पिकांनाही पावसाअभावी फटका बसला आहे. उत्पादन हातातून गेल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे.

मोर्चाच्या अखेरीस शेतकरी प्रतिनिधींनी तहसीलदारांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. लोणार तालुका कोरडादुष्काळग्रस्त जाहीर करावा, नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करावेत आणि हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. तसेच शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळावा, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!