जिल्हा परिषद क्रीडा स्पर्धां मध्ये सामाजिक संदेश
आकर्षक देखाव्यांनी खेळाडूंचे पथसंचलन ठरले लक्षवेधक

बुलढाणा , दि. 4 फेब्रुवारी:-
स्थानिक जिल्हा क्रीडा संकुल येथे आजपासून सुरू झालेल्या जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी यांच्या तीन दिवसीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाच्या पहिल्या दिवशी उद्घाटन समारंभास उपस्थित असलेल्या मान्यवरांना मानवंदना देण्यासाठी जिल्ह्यातील 13 ही पंचायत समिती व जिल्हा परिषद मुख्यालय अशा 14 संघांच्या खेळाडूंनी केलेल्या पथसंचलनात सादर करण्यात आलेले विविध सामाजिक विषय व आशयाधारित देखावे आकर्षक व लक्षवेधक ठरले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांच्या अध्यक्षतेखाली व बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते आज झालेल्या उद्घाटन समारंभ प्रसंगी जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत विविध कर्मचारी अधिकारी यांच्या खेळाडू चमुने पथसंचलन करून उपस्थित मान्यवरांना मानवंदना दिली. त्यामध्ये सर्वप्रथम जिल्हा परिषद मुख्यालयाच्या संघाने राज्य शासनाने गणेशोत्सवास राज्य उत्सवाचा दर्जा दिल्याबद्दल शासनाचे आभार व्यक्त करतांना ढोल, ताशे , लेझीम व भगव्या पताकांसह गणेश पूजनाचा भक्ती भाव दर्शक भव्य देखावा उभारला. त्यानंतर शेगाव पंचायत समितीच्या चमुने मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारा महापुरुषांचा संदेश दृढ करण्यासाठी विविध महापुरुषांच्या वेषभूषा धारण करून उपस्थितांचे लक्ष वेधले.
राष्ट्रमाता मा जिजाऊ साहेबांचे जन्मस्थळ असलेल्या सिंदखेड राजा पंचायत समितीने मा जिजाऊ व बाल शिवबा यासह मावळ्यांची वेशभूषा धारण करून राज्य शासनाने महिला व बाल संगोपनासाठी सुरू केलेल्या आरोग्य व पोषण योजनेस राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचे नाव दिल्याबद्दल शासनाचे आभार व्यक्त करतांनाच बाल संगोपनाचे महत्त्व अधोरेखित केले.
माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर मातृभाषेतील शिक्षण व मराठी शाळांचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने पंचायत समिती मोताळ्यांच्या चमुने मातृभाषेतील शिक्षणाबद्दल जाणीव जागृती केली. याच विषयाला अनुसरून पंचायत समिती मेहेकरच्या चमुने ग्रामीण भागातील मराठी शाळा वाचवा हे आर्जव करणारे कथानक देखाव्यातून सादर केले.
देऊळगाव राजा पंचायत समितीच्या चमुने आपली आगळी वेगळी ओळख दर्शविताना मराठी संस्कृतीतील विविध सण , उत्सव व संस्कृतीचे दर्शन घडविले. राष्ट्राच्या प्रगतीमध्ये साक्षरतेचे महत्त्व लक्षात घेण्यासाठी पंचायत समिती लोणारच्या चमुने नाट्य संगीतिकाद्वारे नवभारत साक्षरता अभियानाचा संदेश दिला.
महिला संरक्षण व सुरक्षेच्या अनुषंगाने ऍसिड हल्ल्याचे संवेदनशील दृश्य उभे करून “तिला जाळू नका”हा समाज सुधार संदेश देऊन “होईल मी स्वयंसिद्ध” असा महिला सक्षमीकरणाचा संदेश पंचायत समिती खामगावच्या खेळाडूंच्या चमुने दिला.
छत्रपती संभाजी महाराजांच्या त्याग व बलिदानाची वीर कथा सादर करतांना चिखली व जळगाव जामोद येथील खेळाडूंच्या चमुने उपस्थिताच्या अंगावर शहारे आणले. तर मलकापूर व नांदुरा या पंचायत समितीमधील खेळाडूंच्या चमुने स्वतंत्रपणे ऑपरेशन सिंदूर व दहशतवाद विरुद्ध मोहिमेची भारतीय सैन्य दलाची सक्षमता व राष्ट्र भक्ती बद्दल संदेश दिला.
जिल्ह्यातील दुर्गम गावांच्या विकासासाठी बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या संग्राम अभियानाच्या अनुषंगाने जाणीव जागृती व उद्बोधन करण्यासाठी बुलढाणा पंचायत समितीच्या चमुने पारंपरिक बंजारा वेषभूषेत व बोलीभाषेत आकर्षक नृत्य सादर केले.
चौदाही संघांनी सादर केलेल्या या आकर्षक देखाव्यांमुळे उद्घाटन समारंभाचे पथसंचलन आकर्षक व लक्षवेधक ठरले.




