पहिल्याच दिवशी धामणगाव बढे येथील जि. प. शाळेचा कायापालट!

एस. बि. शेख / धामणगांव बढे
स्थानिक जिल्हा परिषद मुलांच्या शाळेचा नवा शैक्षणिक प्रवास आजपासून एका आगळ्यावेगळ्या उत्साहात आणि सुसज्ज वातावरणात सुरू झाला. शाळेच्या एका खोलीची अत्यंत दुरावस्था झाली असल्याबाबत येथील शिक्षकांनी युवा व्यावसायिक तथा सामाजिक कार्यकर्ते रविराज महाजन यांच्याकडे शब्द टाकला होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, रविभाऊंनी कोणताही विलंब न लावता तातडीने स्वखर्चातून ३५ ते ४० हजार रुपये खर्च करून त्या वर्गाचा पूर्ण टाइल्स लावून कायापालट केला.
३० जून रोजी शाळा सुरू झाली असता, याच नूतनीकरण केलेल्या वर्गखोलीचे उद्घाटन रविभाऊ महाजन यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. शाळेच्या या विकासात आणखी मोलाची भर घालत मुन्ना सेठ मोदे यांनीही तत्परतेने पुढे येत शाळेला मदत म्हणून ११,००० रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. पहिल्याच दिवशी गावकऱ्यांच्या आणि दानशूरांच्या या अनोख्या दातृत्वामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद पाहायला मिळाला.
“या शाळेने आयुष्याची बेरीज करायला शिकवले” – रविराज महाजन
उद्घाटनप्रसंगी बोलताना रविराज महाजन अत्यंत भावूक झाले होते. आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले,
“आज या शाळेत पाऊल ठेवताच मला माझे बालपण आठवले. याच शाळेत मी पाटीवर पहिली ओळ लिहायला शिकलो. बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार शिकत असताना शिक्षकांनी माझा पाया मजबूत केला. त्यामुळे आज मी माझ्या आयुष्याची बेरीज उत्तम प्रकारे करू शकलो आहे. या शाळेने मला समाजात ताठ मानेने जगण्याचे बळ दिले, आज तिचे ऋण फेडण्याची छोटीशी संधी मला मिळाली, याचे मनाला परम समाधान आहे.” पुढे बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, “मुलांनो, तुम्हाला मिळालेल्या या सुविधांचा पुरेपूर उपयोग करा. खूप शिका, मोठे व्हा आणि आपल्या शाळेचे व कुटुंबाचे नाव उज्ज्वल करा.” तसेच त्यांनी शिक्षकांनी दिलेल्या या सन्मानाबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
गावातून कौतुकाचा वर्षाव:
रविभाऊंचा सामाजिक कार्याचा आलेख
रविराज महाजन यांनी केवळ शाळेलाच नव्हे, तर यापूर्वीही अनेक सामाजिक क्षेत्रात आपल्या दातृत्वाची मोहोर उमटवली आहे:शेतकरी बांधवांना आधार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना संकटसमयी ४१,००० रुपयांची थेट आर्थिक मदत. कन्यारत्न समृद्धी सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत गावातील ५० गरीब कुटुंबांतील मुलींची खाती स्वखर्चाने पोस्ट ऑफिसमध्ये उघडून त्यांचे भविष्य सुरक्षित केले.
ज्ञानाची दारे खुली डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेला अभ्यासाचे साहित्य आणि स्पर्धा परीक्षांची पुस्तके भेट देऊन युवकांना दिशा दिली.
मान्यवरांची उपस्थिती
या शानदार उद्घाटन सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून सरपंच पती मोहन सपकाळ, धनराज महाजन, इसाक पटेल, सादिक बिस्मिल्लाह शेख, शिवसेना शाखा उपप्रमुख राजेश जाधव, भागवत बढे. गजानन गोरे, अजित तडवी आणि शाळेचा संपूर्ण शिक्षकवृंद उपस्थित होता.
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन सचिन रोही सर यांनी केले, तर उपस्थित सर्वांचे आभार अनिल माहुरे यांनी मानले. पहिल्याच दिवशी लोकसहभागातून झालेल्या या डिजिटल व सुसज्ज वर्गखोलीमुळे संपूर्ण परिसरात जिल्हा परिषद शाळेचे आणि दात्यांचे कौतुक होत आहे.



