मोताळयात साकारणार 15 कोटी रुपये किमतीचे मागासवर्गीय मुलींसाठी वस्तीगृह
आमदार संजू गायकवाड यांच्या प्रयत्नांना यश

मोताळा
बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजू गायकवाड यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून मोताळा येथे मागासवर्गीय मुलींसाठी १०० क्षमतेच्या शासकीय वस्तीगृहास मंजुरी मिळाली आहे. सुमारे १५ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पास शासनाची मान्यता मिळाली असून संबंधित शासन आदेशही निर्गमित करण्यात आला आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त राज्यभरात मागासवर्गीय मुलींसाठी ५० नवीन शासकीय वस्तीगृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याअंतर्गत मोताळा तालुक्याच्या ठिकाणी मुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृह उभारण्यास परवानगी देण्यात आली आहे. समाज कल्याण आयुक्तालय, पुणे यांनी सादर केलेल्या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिली असून लवकरच इमारतीच्या बांधकामास सुरुवात होणार असल्याची माहिती मिळाली आहे. शासन आदेशानुसार सर्व नियम व अटींची पूर्तता करून काम सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मोताळा हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असल्याने येथे माध्यमिक, उच्च माध्यमिक, आयटीआय, व्यावसायिक आणि पदवी अभ्यासक्रमांसाठी मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थिनींसाठी राहण्याची सुरक्षित आणि शासकीय सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी अनेक वर्षांपासून मागणी करण्यात येत होती.
विशेषतः मागासवर्गीय मुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृह उभारण्यात यावे, अशी मागणी स्थानिक स्तरावर सातत्याने होत होती. आमदार संजू गायकवाड यांच्या पाठपुराव्यामुळे ही मागणी आता प्रत्यक्षात उतरत असल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शिक्षणासाठी मोठा आधार मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.




