प्रशासनाविरोधात लोणारमध्ये विराट ‘चक्का जाम
लहान मुलांपासून आबालवृद्धांसह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचा आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग, वाहतूक तासभर ठप्प

लोणार | गोपाल तोष्णीवाल
जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या पाण्याची पातळी सातत्याने वाढत असल्याने, ऐतिहासिक व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले प्राचीन कमळजा माता मंदिर पूर्णतः पाण्याखाली गेले आहे. या गंभीर समस्येकडे होणाऱ्या प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षाविरोधात आज संपूर्ण लोणार शहर एकवटले असून, सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने शहरात अभूतपूर्व ‘चक्का जाम’ आंदोलन करण्यात आले. सरोवराचे अस्तित्व आणि ऐतिहासिक वारसा वाचवण्यासाठी पुकारण्यात आलेल्या या आंदोलनात अभूतपूर्व लोकसहभाग पाहायला मिळाला. सकाळी १० वाजल्यापासूनच शहरातील प्रमुख चौकात नागरिकांनी गर्दी केली यामुळे शहरातील वाहतूक पुर्णता ठप्प पडली.
या आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिकांच्या हातात “कमळजा माता मंदिर पाण्याबाहेर काढा” असे लिहिलेले मोठे फलक (बॅनर्स) होते, ज्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या आंदोलनाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये लहान मुलांपासून ते वृद्ध नागरिकांपर्यंत आणि माता-भगिनींनी हातामध्ये मागण्यांचे फलक घेऊन प्रशासनाचा तीव्र निषेध केला. “कमळजा माता मंदिर वाचवा”, “लोणार सरोवर वाचवा” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.कमळजा देवी मंदिर आणि सरोवराच्या संरक्षणासाठी शहरातील सर्वच राजकीय पक्षांचे नेते आणि प्रमुख पदाधिकारी आपले हेवेदावे बाजूला सारून एकाच मंचावर आले होते. सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या आक्रमक उपस्थितीमुळे आंदोलनाला मोठी धार आली. यावेळी लोकप्रतिनिधींनी आपल्या भाषणातून पुरातत्त्व विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या संथ कारभारावर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. सरोवरामध्ये बाहेरून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. यामुळे केवळ कमळजा माता मंदिरच जलमग्न झाले नाही, तर सरोवराची वैशिष्ट्यपूर्ण अल्कधर्मी जैवविविधता आणि सभोवतालचा परिसर धोक्यात आला आहे. प्रशासनाने यावर तात्काळ शास्त्रोक्त तोडगा काढून पाणी पातळी नियंत्रित करावी, अशी मागणी आंदोलकांनी लावून धरली. या तीव्र चक्का जाम आंदोलनामुळे लोणार परिसरातील प्रमुख मार्गांवरील वाहतूक कित्येक तास पूर्णपणे ठप्प झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलनाची आक्रमकता पाहून अखेर संबंधित विभागाच्या आधिकाऱ्यनी घटनास्थळी धाव घेतली. आंदोलकांनी प्रशासनाला मागण्यांचे निवेदन सादर करत,
प्रशासनाला चेतावनी
येत्या काही दिवसांत सरोवरातील पाण्याचा निचरा करण्यासाठी आणि मंदिराच्या संरक्षणासाठी युद्धपातळीवर काम सुरू न झाल्यास, यापेक्षाही तीव्र आणि बेमुदत आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा प्रशासनाला दिला आहे.



