लोणार ग्रामीण रुग्णालयातील औषध वितरणाचा प्रश्न ऐरणीवर
शिकाऊ उमेदवारांकडून औषध वाटप; तातडीने पूर्णवेळ फार्मासिस्ट नियुक्त करण्याची मागणी

लोणार
लोणार ग्रामीण रुग्णालयात गेल्या काही महिन्यांपासून नियमित फार्मासिस्ट उपलब्ध नसल्याने औषध वितरण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या रुग्णालयातील औषध विभागाचे काम तात्पुरत्या स्वरूपात शिकाऊ उमेदवारांकडून करून घेतले जात असल्याचा आरोप असून, यामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
ग्रामीण भागातील शेकडो रुग्ण दररोज उपचारासाठी या रुग्णालयात येतात. डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे योग्य प्रमाणात व योग्य पद्धतीने देण्याची जबाबदारी औषध विभागावर असते. त्यामुळे या विभागात पात्र व अनुभवी फार्मासिस्टची नियमित उपस्थिती असणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. शिकाऊ उमेदवारांकडून औषध वितरण होत असल्याने काही त्रुटी उद्भवल्यास त्याची जबाबदारी कोणाची, असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे.
दरम्यान, रुग्णालय प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी कार्यरत असलेल्या फार्मासिस्टची प्रशासकीय नियमानुसार बदली झाली आहे. त्यांच्या जागी नवीन फार्मासिस्टची नियुक्ती करण्यात आली असून, कौटुंबिक वैद्यकीय कारणामुळे ते अद्याप रुजू झालेले नाहीत. फार्मासिस्ट उपलब्ध नसल्यामुळे औषध विभाग बंद ठेवणे शक्य नसल्याने रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी तात्पुरती व्यवस्था करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
शिकाऊ उमेदवारांना औषध वितरणाच्या कामात रुग्णालयातील अनुभवी कर्मचारी मार्गदर्शन करत असून, औषधांमध्ये कोणतीही चूक होऊ नये यासाठी त्यांच्यावर देखरेख ठेवली जात असल्याचे वैद्यकीय अधीक्षकांनी सांगितले. तसेच पूर्णवेळ फार्मासिस्ट उपलब्ध करून देण्यासाठी वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांकडे लेखी पत्रव्यवहार करून पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, औषध विभागासाठी तातडीने पूर्णवेळ व पात्र फार्मासिस्ट उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी अजितदादा पवार गटाचे शहराध्यक्ष तौफिक कुरेशी यांनी केली आहे. मागणीची दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
तात्पुरती व्यवस्था, अनुभवी कर्मचाऱ्यांचे नियंत्रण
फार्मासिस्ट अद्याप रुजू न झाल्याने औषध विभाग बंद ठेवता येत नसल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे शिकाऊ उमेदवारांकडून तात्पुरते काम करून घेतले जात असून, अनुभवी कर्मचारी त्यांना मार्गदर्शन व देखरेख करत आहेत. पूर्णवेळ फार्मासिस्टसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.




