प्रबोधन विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचे स्नेहमिलन, शालेय आठवणींना दिला उजाळा
प्रबोधन विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचे स्नेहमिलन, शालेय आठवणींना दिला उजाळा
प्रतिनिधी | बुलडाणा
येथील प्रबोधन विद्यालयातील १९७७-७८ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे स्नेहमिलन कार्यक्रम माजी विद्यार्थी नामदेव टेहरे यांच्या पुढाकाराने घडवून आणण्यात आले. हा कार्यक्रम १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जिजामाता नगर येथील शाळेत पार पडला.
यावेळी माजी विद्यार्थांचे मन शाळेचा परिसर पाहून गहिवरून गेले. त्यातच काहींनी शाळेच्या प्रगतीबद्दल गौरवद्गार काढले. या निमित्ताने शाळेच्या सभागृहामध्ये त्यांना असलेल्या सेवानिवृत्त शिक्षक शालिग्राम शित्रे, श्रीकृष्ण अवचार, विश्वंभर वाघमारे तसेच शिप्र मंडळ बुलढाण्याचे माजी अध्यक्ष बबनराव जामदार, उपाध्यक्ष उद्धवराव वाळेकर, विद्यमान अध्यक्ष किशोर जामदार, सचिव मंगेश वाघमारे, मुख्याध्यापक चंद्रकांत जोशी यांचा या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाळ श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी शाळेचे माजी विद्यार्थी विवेक साठे, प्रभा जोशी, बबन शिरसाट, सुरडकर यांनी शालेय जिवनातील अनेक प्रसंगावर प्रकाश टाकला. अनेक शिक्षक व शाळेवरच्या कवितांचे सादरीकरण करण्यात आले. शाळेच्या शिस्त, आवडते शिक्षक यांच्या बद्दल अनेकांनी गमंतीदार किस्से सांगितले. अतिशय रंगदार हा माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिंलन कार्यक्रम झाला. सगळे विद्यार्थी एकत्रित येऊन मनोमिलन झाल्याने अनेकांच्या डोळ्यातून आनंदाश्रृ बाहेर पडले.
या प्रसंगी श्रीकृष्ण अवचार, किशोर जामदार, मंगेश वाघमारे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचलन प्रभा जोशी यांनी केले. तर आभार विवेक साठे यांनी मानले. स्नेहभोजनाने या कार्यक्रमाची सांगता झाली. माजी विद्यार्थी नामदेव टेहरे, रंजन सराफ यांनी हा माजी विद्यार्थी स्नेहमिलन कार्यक्रम घडवून आणला. या कार्यक्रमाला प्रबोधन विद्यालयाचे उपमुख्याध्यापक गजानन चिम, पर्यवेक्षक रविंद्र गणेशे, मनोज खंदारकर, अरूण बोरबळे यासह माजी विद्यार्थी उपस्थित होते.




