पंचायत समितीच्या केबिनधील आंदोलन आटोपले रात्री बारा वाजता

पंधराव्या वित्त आयोगात देऊळघाटमधील भ्रष्टाचार
ग्राम विकास अधिकारी राजरत्न जाधव यांनी केला निलंबनात ४५ लाखाचा अपहार
प्रतिनिधी | बुलडाणा
देऊळघाट या ग्राम पंचायतीच्या तत्कालीन ग्राम विकास अधिकारी यांनी शासकीय रजेवर असतांना ५२ तर निलंबन काळात ४५ लाख रुपयांचा अपहार केला आहे, असा आरोप करत माजी सरपंच आरिफ खानसह इतरांनी पंचायत समिती गट विकास अधिकारी यांचे दालनात सुरु केलेले आंदोलन रात्री बारा वाजेच्या दरम्यान स्थगित करण्यात आले. गट विकास अधिकारी यांनी दिलेल्या कारवाईच्या आश्वासनावर हे आंदोलन संंपले.
तालुक्यातील देऊळघाट ग्रामपंचायत मध्ये 15 वित्त आयोगाच्या निधीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे.तत्कालीन ग्रामविकास अधिकारी हे शासकीय सुट्टीवर असतांना आणि निलंबित असताना त्यांनी शासकीय निधी काढल्याचा गंभीर आरोप सिद्ध झालेला असून ग्रामविकास अधिकारी आणि सरपंचावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा मागणीसाठी गट विकास अधिकारी यांच्या दालनात दुपारपासून बैठा आंदोलन सुरु करण्यात आले होते. तत्कालीन ग्रामविकास अधिकारी राजरत्न जाधव हे शासकीय सुट्टीवर असताना त्यांनी ५२ लाख तसेच निलंबित असताना ४५ लाख रुपयांचा निधी शासकीय खात्यातून काढल्याची तक्रार माजी सरपंच आरिफ खान, माजी तंटामुक्त अध्यक्ष जुनैद खान, माजी सरपंच गजनफरउल्ला खान, माजी उपसभापती मुश्ताक अहमद व इतरांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती. या गंभीर तक्रारीची दखल घेत प्रकरणाची चौकशी करण्यात आली असता त्यात तथ्य आढळल्याने तत्कालीन ग्रामविकास अधिकारी तसेच सरपंच यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश ८ जानेवारी रोजी देण्यात आले.परंतु पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ.अमिता पवार हे टोलवाटोलवी करीत असल्याने त्यांच्या केबिनमध्ये बैठा आंदोलन सुरू करण्यात आले होते .रात्री ९:३० वाजेपर्यंत या आंदोलनाची दखल कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली नाही . रात्री पावणे बारा वाजता गट विकास अधिकारी यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर सदर आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. ५ फेब्रुवारी पर्यंत त्यांनी कारवाईची आश्वासन दिले
—-



