लाल बावट्याच्या लाँग मार्चची मुख्यमंत्रीांकडून दखल

लाल बावट्याच्या राजुर लॉंग मार्चची यशस्वी सांगता, कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसह आदिवासी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर निर्णय

किसान सभा आणि सीटू कामगार संघटनेच्या वतीने 24 फेब्रुवारी रोजी अकोले तालुक्यातील राजुर येथून सुरू झालेल्या लाल बावट्याच्या लॉंग मार्चची संगमनेर तालुक्यातील निझरणेश्वर येथे 27 फेब्रुवारी रोजी दुपारी उत्स्फूर्त वातावरणात सांगता करण्यात आली.
तीन दिवसांत तब्बल 58 किलोमीटरचा पायी प्रवास करत हा लॉंग मार्च नगर जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या गावाच्या वेशीपर्यंत पोहोचला होता. या मोर्चात आदिवासी शेतकरी, कष्टकरी आणि विविध क्षेत्रांतील कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनाद्वारे उपस्थित करण्यात आलेल्या मागण्यांवर शासनाने सकारात्मक भूमिका घेत महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केले. अर्धवेळ परिचरांना दोन हजार रुपये आणि शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना एक हजार रुपयांची वेतनवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच भंडारदरा धरणातील पाणी परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांना पिण्यासाठी व सिंचनासाठी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले. वनजमिनी व घरांच्या तळजमिनी श्रमिकांच्या नावे करण्याच्या राज्यस्तरीय निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी तसेच बांधकाम कामगारांसाठी शस्त्रक्रियेबरोबरच इतर आजारांसाठी कुटुंब मेडिक्लेम योजनेला मान्यता देण्यात आली.
या मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी 26 फेब्रुवारी रोजी मुंबई मंत्रालयात पालकमंत्री विखे पाटील, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, आरोग्यमंत्री प्रकाश अाबिटकर, आदिवासी विकास मंत्री अशाेक उइके आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. काही मागण्यांवर तत्काळ निर्णयासाठी आर्थिक तरतुदीची आवश्यकता असल्याने मंत्रिमंडळ बैठकीत विषय मांडण्यात आला व मुख्यमंत्री यांच्या मान्यतेनंतर वेतनवाढीसह अन्य निर्णय जाहीर करण्यात आले.
यावेळी शासनाच्या निर्णयांची माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय अधिकारी अरुण उंडे व उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांनी आंदोलनकर्त्यांना दिली. त्यानंतर वृद्ध, अपंग, निराधार यांचे मानधन, आशा व अंगणवाडी सेविका, अर्धवेळ परिचर, शालेय पोषण आहार कर्मचारी, बांधकाम कामगार आणि आदिवासी शेतकरी यांच्या प्रश्नांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली. मान्य मागण्यांच्या अंमलबजावणीबाबत वारंवार खात्री करून घेत अखेर लोणी गावाजवळील निझरणेश्वर मंदिर परिसरात लॉंग मार्च स्थगित करण्याची घोषणा करण्यात आली.

या मोर्चात माकपच्या पॉलिट ब्युरो सदस्य मरियम ढवळे, आमदार विनोद निकोले, अशोक थोरात, किसान सभेचे राज्याध्यक्ष उमेश देशमुख यांच्यासह जितेंद्र चोपडे, उद्धव पौळ, रामेश्वर पौळ, दीपक लिपणे, धर्मा शिंदे, नवनाथ मोरे, तबरेज शेख आदी पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. मोर्चाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, नंदू डहाणे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, गणेश ताजणे, संगीता साळवे, हेमलता शेळके, तुळशीराम कातोरे, सुमन विरनक, राजाराम गंभीरे, ताराचंद विघे, मथुराबाई बर्डे आदींनी परिश्रम घेतले.

 

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!