राज्यभरात धावणार ‘राजमाता जिजाऊ लक्झरी बस
बससेवेचे लोकार्पण केले मुख्यमंत्री फडणवीस यांनी

प्रतिनिधी | मुंबई
‘शिवनेरी’, ‘शिवशाही’, ‘शिवाई’, ‘यशवंती’ ‘हिरकणी’ नंतर आता राजमाता जिजाऊ एसटी प्रवाशांच्या सेवेसाठी अवतरली आहे. या लक्झरी बसचे लोकार्पण नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच केले आहे.
या लक्झरी बसमध्ये आरामदायी आसनव्यवस्था, वातानुकूलित सुविधा (AC), स्वच्छता, या सह बसमध्ये 4 सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस यंत्रणा, पॅनिक बटन, पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम तसेच इलेक्ट्रॉनिक मार्ग फलक यांचा समावेश आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ही बस सेवा उपयुक्त ठरणार आहे.
या बसमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठे बळ मिळणार आहे. या बसेसना ‘राजमाता जिजाऊ’ हे नाव देण्यामागे हिंदवी स्वराज्याच्या प्रेरणास्थान असलेल्या जिजाऊसाहेबांना अभिवादन करण्याची भावना आहे. स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मागील संस्कारशक्ती म्हणजे राजमाता जिजाऊ होय. या मातृशक्तीचा गौरव या नावातून अधोरेखित करण्यात आला आहे.
या योजनेअंतर्गत पहिल्या 50 बसेस नागपूर येथे दाखल होणार आहेत. तेथून या नव्या सेवेला प्रारंभ करण्यात येणार आहे. ‘राजमाता जिजाऊ’ बससेवा ही केवळ वाहतुकीची सुविधा नसून महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभिमान आणि आधुनिकतेचा आत्मविश्वास यांचा संगम आहे. या उपक्रमामुळे राज्यातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम, सुरक्षित आणि प्रवासी-केंद्रित होईल, अशी अपेक्षा मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली.




