स्वतःला दत्तधाम सरकार म्हणून घेणारा राजेंद्र गडगे निघाला वीज चोर

अहिल्यानगर | प्रतिनिधी

जिल्हयातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान परिसरात ‘दत्तधाम’ नावाने आश्रम चालवणाऱ्या भोंदू राजेंद्र गडगे हा वीज चोर निघाला.  याभागातील नागरिकांना तंत्र मंत्र व जादू टोणाच्या नावाखाली दैवी शक्तीचा आपल्यात संचार असतो म्हणत  लोकांची फसवणूक प्रकरणी आरोपीला आधीच अटक करण्यात आली आहे. आता  महावितरणनेही मोठी कारवाई केली आहे. आश्रमात छापा टाकताना वीज चोरीचा प्रकार उघड झाल्यानंतर महावितरणने त्याच्यावर दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

महावितरणच्या पथकाने आश्रमाची तपासणी केली असता, मुख्य वीज मीटरला बायपास करून थेट वीज वापर केली जात असल्याचे स्पष्ट झाले. आश्रमात एसी, पाण्यासाठी बोअरवेल आणि इतर सुविधा चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वीज वापरली जात होती. मात्र, त्याचे बिल भरण्याऐवजी बेकायदेशीर मार्गाने वीज चोरी केली जात असल्याचे आढळले. या प्रकारामुळे महावितरणने तत्काळ दंडात्मक कारवाई सुरू केली.

राजेंद्र गडगे स्वतःला दत्तधाम सरकार म्हणून ओळख करून देत असे. युट्यूब आणि इतर माध्यमांतून तो गंभीर आजार बरे करण्याचे, तसेच अपत्यप्राप्ती करून देण्याचे खोटे दावे करत होता. या बहाण्याने तो भक्तांकडून 15 हजार ते 51 हजार रुपयांपर्यंत रक्कम घेत असल्याची माहिती समोर आली आहे. लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पाठपुराव्यामुळे संगमनेर पोलिसांनी गडगेसह त्याच्या मुलीवर आणि इतर सहकाऱ्यांवर जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या तो पोलिस कोठडीत असून, महावितरणच्या कारवाईमुळे त्याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. वीज चोरी प्रकरणातही पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी गडगेच्या आश्रमाची सुमारे चार तास सखोल झाडाझडती घेतली. वडगावपान येथील दत्तधाम दरबारात पंचनामा करण्यात आला. या वेळी गडगे याला घटनास्थळी नेण्यात आले असता त्याने अंनिसवरच आरोप करत आपल्याविरोधात कट रचल्याचा दावा केला. मी लोकांची सेवा करतो, माझ्याकडे दैवी शक्ती आहे, असे तो पोलिसांसमोर ठामपणे सांगत होता.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!