बोथा घाटात मृत्यूचा थरार; दरीत कुजलेल्या अवस्थेत दोघांचे मृतदेह

 

खामगाव :

 

बुलढाणा रोडवरील बोथा घाट परिसरात खोल दरीत दुचाकीसह दोन जणांचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने शनिवारी सकाळी परिसरात एकच खळबळ उडाली. दुर्गंधी येत असल्याची माहिती स्थानिकांकडून पोलिसांना मिळाल्यानंतर हा थरारक प्रकार उघडकीस आला. प्राथमिक तपासात तीन दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

हिवरखेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घाट परिसराची पाहणी केली असता खोल दरीत एमएच-२७ बीपी-५६२० क्रमांकाची दुचाकी आणि त्याजवळ दोन मृतदेह आढळून आले. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढत घटनास्थळीच पंचनामा आणि शवविच्छेदन प्रक्रिया पार पाडली.

मृतांची ओळख जयराम उर्फ सचिन सुरेश कांडेलकर (३०, रा. बोथा) आणि मुन्ना दादू जामुनकर (४५, रा. चिखलदरा, जि. अमरावती) अशी पटली. दोघेही काही दिवसांपूर्वी बुलढाणा येथे गेले होते. तेथून परतताना बोथा घाटातील वळणावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन थेट दरीत कोसळल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
सचिन कांडेलकर बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी ७ मे रोजी बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात नोंदविली होती. मात्र तोपर्यंत दोघेही मृत्यूशी झुंज हरून दरीतच पडून असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

या प्रकरणी हिवरखेड पोलिसांनी दुचाकी चालक मुन्ना जामुनकर यांच्याविरुद्ध अपघाताची नोंद केली असून पुढील तपास प्रभारी ठाणेदार आशिष केचरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

— दुर्गंधीने उघड केला मृत्यूचा रहस्य–

बोथा घाट परिसरातून तीव्र दुर्गंधी येत असल्याने स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी शोधमोहीम राबविल्यानंतर खोल दरीत दुचाकीसह दोघांचे मृतदेह आढळले. त्यामुळे घाट परिसरात मोठी खळबळ उडाली.

–बुलढाण्यातून निघाले… पण घरी पोहोचलेच नाहीत–

मुन्ना जामुनकर हे रायपूर पोलिस हद्दीत मळणी यंत्रावर कामासाठी आले होते. तर सचिन कांडेलकर बुलढाणा येथे जेसीबी मशीनवर काम करत होते. बुलढाण्यातून परतताना त्रिशरण चौकात कांडेलकर यांनी जामुनकर यांच्या दुचाकीवर लिफ्ट घेतल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

— घाटातील वेग ठरला जीवघेणा?–

बोथा घाटातील तीव्र वळणे, उतार आणि वेगामुळे दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दुचाकी थेट दरीत कोसळल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!