मदर डे विशेष: मातृप्रेम: मोबाईलच्या स्क्रीनवर की आईच्या सेवेत?”

लोणार — गोपाल तोष्णीवाल
आज जगभरात ‘मदर्स डे’ मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सोशल मीडिया उघडताच प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर आईसोबतचा सेल्फी किंवा तिच्याबद्दलचे प्रेमळ संदेश दिसत आहेत. मात्र, या आभासी दुनियेत आईवर जेवढे प्रेम दाखवले जात आहे, तेवढेच प्रेम जर वास्तवात असते, तर आज वृद्धाश्रमांची गरजच भासली नसती, अशी संतप्त पण वास्तववादी प्रतिक्रिया समाजातील सुजाण नागरिकांमधून उमटत आहे.दिखाऊगिरीच्या काळात हरवलेले कर्तव्य आजच्या धावपळीच्या युगात ‘मदर्स डे’ हा केवळ फोटो शेअर करण्यापुरता मर्यादित राहिला आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एका बाजूला सोशल मीडियावर ‘आई विना जग अपुरे’ असे स्टेटस लावले जात असताना, दुसरीकडे वृद्धाश्रमांची वाढती संख्या ही चिंतेची बाब ठरत आहे. ज्या आईने रक्ताचे पाणी करून मुलांना लहानाचे मोठे केले, त्याच आईला उतारवयात चार भिंतींच्या आड सोडून येणाऱ्या मुलांची संख्याही कमी नाही.
आजच्या काळात अनेक वृद्धाश्रमांमध्ये अशा माता आहेत, ज्यांचे मुले परदेशात किंवा मोठ्या शहरात सुस्थितीत आहेत. “माझ्या मुलाने आज स्टेटस काय लावले असेल माहीत नाही, पण त्याने आज फोन करून माझी चौकशी केली तरी माझ्यासाठी तोच खरा मदर्स डे असेल,” अशी भावूक प्रतिक्रिया एका मातेने दिली. आईवरचे प्रेम हे स्टेटसच्या चौकटीत अडकवून ठेवण्यापेक्षा, तिच्या डोळ्यांत उतारवयात समाधान कसे राहील, हे पाहणे हीच तिची खरी सेवा ठरेल. ज्या दिवशी समाजातील प्रत्येक मुलाला आपल्या आईचा सांभाळ करणे हे ओझे न वाटता कर्तव्य वाटेल, त्याच दिवशी खऱ्या अर्थाने वृद्धाश्रमांची दारे कायमची बंद होतील.
“स्टेटसच्या गर्दीत आईचा फोटो शोधण्यापेक्षा,तिच्या सुरकुत्या पडलेल्या हातांना प्रेमाने स्पर्श करून पहा…जगातील सर्व सुखांचा ठेवा तिथेच गवसेल!”




