पालापाचोळ्याच्या आगीने घेतला भीषण आकार; सिलेंडर स्फोटात महिलेचा मृत्यू

मलकापूर, दि. १२ (प्रतिनिधी)

शहरातील अशोक नगर परिसरात सोमवारी दुपारी लागलेल्या आगीने अचानक भीषण रूप धारण केल्याने एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. पालापाचोळ्याला लागलेली आग घरापर्यंत पोहोचून गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही दुर्घटना घडली. घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, नर्मदाबाई सुखदेव लासुरकर या अशोक नगर परिसरातील टिनपत्र्याच्या भाड्याच्या घरात राहत होत्या. दुपारच्या सुमारास घराजवळील पालापाचोळ्याला अचानक आग लागली. सुरुवातीला लहान स्वरूपात असलेली आग काही वेळातच वेगाने पसरली आणि घरालाही विळखा घातला.

आगीच्या ज्वाळा घरातील गॅस सिलेंडरपर्यंत पोहोचल्याने जोरदार स्फोट झाला. या स्फोटात नर्मदाबाई लासुरकर गंभीररीत्या भाजल्या गेल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. स्फोटाचा आवाज परिसरात घुमल्याने नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तातडीने दाखल झाले. जवानांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले. दरम्यान, मदतकार्यात परिसरातील नागरिकांसह मनीष लखानी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनीही सहभाग घेतला.

मलकापूर शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक गणेश गिरी व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला असून पुढील तपास सुरू आहे.

चौकट : दुहेरी दुःखाने परिसर हळहळला

नर्मदाबाई लासुरकर या आपल्या वयोवृद्ध भावासोबत मुकुंद नगर परिसरात राहत होत्या. मात्र, अवघ्या आठ दिवसांपूर्वीच त्यांच्या भावाचे निधन झाले होते. भावाच्या मृत्यूनंतर त्या एकट्याच राहत असल्याचे सांगितले जाते. त्यानंतर एवढ्यातच ही दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!