देशभरात खळबळ! नीट पेपर फुटला; NEET-UG परीक्षा 2026 अखेर रद्द

नवी दिल्ली :
देशातील वैद्यकीय शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी NEET-UG 2026 परीक्षा अखेर रद्द करण्यात आल्याने देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. प्रश्नपत्रिका फुटल्याच्या गंभीर आरोपांनंतर National Testing Agency (NTA) आणि केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला असून, आता फेरपरीक्षा घेण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.
३ मे रोजी देशभरातील विविध केंद्रांवर ही परीक्षा पार पडली होती. मात्र परीक्षा संपल्यानंतर काही तासांतच सोशल मीडियावर पेपरफुटीचे आरोप व्हायरल होऊ लागले. राजस्थान, बिहार आणि उत्तर प्रदेशसह काही राज्यांत परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका काही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचा दावा करण्यात आला. विशेष म्हणजे, राजस्थानमध्ये उपलब्ध असलेल्या एका ‘गेस पेपर’मधील अनेक प्रश्न मूळ प्रश्नपत्रिकेशी जुळत असल्याचे समोर आल्यानंतर संशय अधिक बळावला.
या प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. अनेक विद्यार्थ्यांनी “प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्यांवर अन्याय झाला” अशी भावना व्यक्त करत फेरपरीक्षेची मागणी केली. सोशल मीडियावर #ReNEET आणि #NEETPaperLeak हे हॅशटॅग मोठ्या प्रमाणावर ट्रेंड झाले. विविध विद्यार्थी संघटनांनी तसेच विरोधी पक्षांनीही या प्रकरणी केंद्र सरकारवर टीका केली.
दरम्यान, प्राथमिक चौकशीत काही संशयास्पद आर्थिक व्यवहार, मोबाईल चॅट्स आणि पेपरफुटीशी संबंधित पुरावे समोर आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. काही ठिकाणी परीक्षा सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिकेची छायाचित्रे व्हायरल झाल्याचाही दावा करण्यात आला आहे.
या गंभीर प्रकरणाची चौकशी आता Central Bureau of Investigation (CBI) कडे सोपविण्यात आली असून, पेपरफुटीमध्ये सहभागी असलेल्या दलाल, कोचिंग नेटवर्क आणि इतर संबंधितांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहितीही समोर येत आहे.
NTA कडून लवकरच नव्या परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या जाणार असून, विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. फेरपरीक्षा अधिक कडक सुरक्षा व्यवस्थेत आणि तांत्रिक देखरेखीखाली घेतली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, या घटनेमुळे देशातील स्पर्धा परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मागील काही वर्षांत विविध भरती व प्रवेश परीक्षांमध्ये पेपरफुटीच्या घटना समोर आल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी वाढत असून, आता परीक्षा प्रक्रियेत मोठे बदल आणि कठोर कायद्यांची मागणी जोर धरू लागली आहे.


