बुलढाण्यात लाकूड तस्करीवर वनविभागाचा मोठा घाव
सहा सा-मिलवर एकाचवेळी धाडी; शेकडो घनमीटर संशयित लाकूड जप्त, परराज्य कनेक्शन तपासाच्या रडारवर

बुलढाणा: जिल्ह्यात अवैध लाकूड व्यवहारांचे जाळे किती विस्तारले आहे, याची मोठी झलक मंगळवारी वनविभागाच्या कारवाईतून समोर आली. जिल्ह्यातील विविध भागांतील सहा सा-मिलवर टाकलेल्या धाडीत वनविभागाने तब्बल ८०० घनमीटरहून अधिक संशयित अवैध लाकूड ताब्यात घेतले. नव्याने रुजू झालेले उपवनसंरक्षक जमीर शेख यांनी स्वतः या मोहिमेची सूत्रे हातात घेतल्याने जिल्ह्यातील लाकूड तस्करीच्या साखळीत खळबळ उडाली आहे.
वनविभागाला काही दिवसांपासून परवानगीपेक्षा अधिक प्रमाणात लाकूड साठवण आणि प्रक्रिया होत असल्याची गुप्त माहिती मिळत होती. काही सा-मिलमध्ये परराज्यातून आणलेले सागवान आणि इतर मौल्यवान लाकूड स्थानिक कागदपत्रांच्या आधारे प्रक्रिया केल्याचा संशयही व्यक्त केला जात होता. त्यानंतर वनविभागाने नियोजनबद्ध कारवाई करत जिल्हाभर छापेमोहीम उघडली.
चिखली तालुक्यातील केळवद येथील विश्वकर्मा सा-मिलवर सकाळी टाकलेल्या धाडीत मोठ्या प्रमाणावर सागवान, खैर, कडूनिंब आणि कटसाइज लाकूड आढळून आले. संबंधितांकडे आवश्यक परवान्यांची मागणी करण्यात आली; मात्र समाधानकारक कागदपत्रे सादर करण्यात आली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. प्राथमिक तपासात अंदाजे दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सा-मिल सील करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. संबंधितांवर वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मलकापूर शहरातील चार सा-मिलची तपासणी करताना नोंदी आणि प्रत्यक्ष साठा यामध्ये मोठी विसंगती आढळल्याची माहिती समोर आली. विशेष म्हणजे प्राथमिक चौकशीत मध्यप्रदेशातील खंडवा आणि बुऱ्हाणपूर भागातून मोठ्या प्रमाणावर लाकूड बुलढाण्यात आणले जात असल्याचे उघड झाले आहे. जळगाव जिल्ह्यातूनही लाकूड पुरवठ्याचा मागोवा लागल्याने तपासाची व्याप्ती वाढली आहे.
दरम्यान, दसरखेड एमआयडीसी परिसरातील एका सा-मिलमध्येही संशयित अवैध लाकूडसाठा सापडल्याने वनविभागाने अधिक चौकशी सुरू केली आहे. अनेक ठिकाणी परवान्यांशिवाय प्रक्रिया सुरू असल्याचा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच एवढ्या व्यापक स्वरूपात कारवाई झाल्याने वनविभागाने अवैध लाकूड साखळीविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे मानले जात आहे.
ही मोहीम केवळ कागदपत्र तपासणीपुरती मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष साठा, वाहतूक मार्ग, पुरवठा साखळी आणि व्यवहारांची पडताळणी अशा अनेक स्तरांवर सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात आणखी मोठे खुलासे समोर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या कारवाईत वनपाल प्रदीप मुंडे, किशोर पडोळ, उमेश राऊत यांच्यासह बुलढाणा, मोताळा आणि जळगाव जामोद वनपरिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील वाकोडे करीत आहेत.
—
■ मध्यप्रदेशातून बुलढाण्याकडे ‘लाकूड कॉरिडॉर’?
प्राथमिक तपासात मध्यप्रदेशातील खंडवा आणि बुऱ्हाणपूर भागातून सागवानासह विविध प्रकारचे लाकूड बुलढाण्यात आणले जात असल्याचे समोर आले आहे. काही ठिकाणी वाहतुकीची कागदपत्रे आणि प्रत्यक्ष साठा यामध्ये तफावत आढळल्याने परराज्यांशी जोडलेल्या मोठ्या नेटवर्कची शक्यता वनविभाग तपासत आहे.
—“अवैध साठ्यावर कठोर कारवाई होणार
“अवैध साठ्यावर कठोर कारवाई होणा”
“गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात संशयित लाकूड जप्त करण्यात आले आहे. सर्व लाकडाचे मोजमाप आणि कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. संबंधित सा-मिल चालकांविरुद्ध वनगुन्हे दाखल करण्यात येतील. परवानगीशिवाय लाकूड साठवण किंवा प्रक्रिया करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल,” असा इशारा उपवनसंरक्षक जमीर शेख यांनी दिला.




