‘शिक्षक द्या… अन्यथा तीव्र आंदोलन!’

वझर आघावमध्ये शालेय व्यवस्थापन समिती व पालक आक्रमक

 

वझर आघाव

येथील शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, याचा थेट फटका तब्बल १८० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बसत आहे. अनेकदा पाठपुरावा करूनही शिक्षण विभागाने रिक्त पदे भरण्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही न केल्याने शालेय व्यवस्थापन समिती, पालक आणि ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तातडीने शिक्षकांची नियुक्ती न झाल्यास शिक्षण विभागाविरोधात तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला असून आंदोलनाची दिशा लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग असून शाळेसाठी आठ शिक्षकांची पदे मंजूर आहेत. मात्र, प्रत्यक्षात केवळ सहा शिक्षक कार्यरत असून एक उच्च श्रेणी शिक्षक व एक सहाय्यक शिक्षकाचे पद दीर्घकाळापासून रिक्त आहे. त्यामुळे उपलब्ध शिक्षकांवर अनेक वर्गांचा अतिरिक्त ताण पडत असून विद्यार्थ्यांना विषयनिहाय दर्जेदार अध्यापन मिळणे कठीण झाले आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होत असल्याची खंत पालकांनी व्यक्त केली आहे.
शासन ‘शाळा टिकवा, विद्यार्थी वाढवा’चा संदेश देत जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी विविध योजना राबवत आहे. पालकांनी खासगी शाळांऐवजी जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश द्यावा, असे आवाहनही सातत्याने केले जाते. मात्र, दुसरीकडे शिक्षकांची रिक्त पदे महिनोनमहिने भरली जात नसल्याने शासनाच्या धोरणावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “शिक्षकच नसतील तर गुणवत्तापूर्ण शिक्षण कोण देणार आणि विद्यार्थ्यांचे भविष्य कोण घडविणार?” असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.
शालेय व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, रिक्त पदांमुळे शिक्षकांना एकाच वेळी अनेक वर्गांची जबाबदारी सांभाळावी लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देणे अशक्य होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही शहरांप्रमाणे दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी शासनाने तातडीने शिक्षकांची नियुक्ती करणे अत्यावश्यक आहे.
याबाबत संबंधित गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषद प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊन पाठपुरावा करण्यात आला. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप शालेय व्यवस्थापन समितीने केला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान लक्षात घेता रिक्त पदे तातडीने भरावीत, अन्यथा शालेय व्यवस्थापन समिती, पालक आणि ग्रामस्थांच्या नेतृत्वाखाली शिक्षण विभागाविरोधात मोठ्या प्रमाणावर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
आता शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून त्वरित निर्णय घेतो की पुन्हा आश्वासनांवरच वेळ काढतो, याकडे वझर आघाव येथील पालकांचे लक्ष लागले आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!