गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार म्हणजे प्रेरणादायी परंपरा – संग्राम पाटील

बुलढाणा :

यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करणे ही समाजाच्या संस्कृतीला साजेशी परंपरा असून बुलढाण्यातील गर्दे वाचनालयाने ही परंपरा सातत्याने जपली आहे, असे प्रतिपादन बुलढाणा शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार संग्राम पाटील यांनी केले. गर्दे वाचनालयात आयोजित इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.

  सदर कार्यक्रम सोमवार २५ मे रोजी गर्दे वाचनालय परिसरात पार पडला.  यावेळी कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे उपाध्यक्ष बाबासाहेब वरणगावकर होते.

 यावेळी बोलताना संग्राम पाटील म्हणाले की, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार एखाद्या अधिकाऱ्याच्या हस्ते होणे ही विद्यार्थ्यांसाठी मोठी प्रेरणा असते. बुलढाणा जिल्ह्यातील दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव हा जिल्ह्याचा नावलौकिक वाढवणारा ठरत आहे. गर्दे वाचनालयाच्या माध्यमातून शहरात विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रम राबविले जात असून हे वाचनालय संस्कृती आणि सांस्कृतिक ठेवा जपणारे महत्त्वाचे केंद्र बनले आहे.

       या प्रसंगी व्यासपीठावर उल्का अंतरकर, गजानन चीम, रुपेश खंडारे, उदय देशपांडे, अमोल बल्लाळ, डॉ. प्रवीण पिंपरकर, आशुतोष वाईकर, संजय काळे, डॉ. सुभाष जोशी, देवेंद्र खोत तसेच नगरपरिषदेचे सभापती दीपक सोनुने उपस्थित होते.  यावेळी बोलताना उल्का अंतरकर म्हणाल्या की, गुणवंत विद्यार्थी हे आपल्या शाळेचा गौरव असतात. कठोर परिश्रम हेच यशाचे खरे गमक असून अभ्यासातून मिळालेले यश कायम आनंद देणारे असते. गजानन चीम यांनी विद्यार्थ्यांना शिस्त आणि सातत्याचे महत्त्व पटवून देत ध्येय निश्चित करून अभ्यास करण्याचा सल्ला दिला. तर रुपेश खंडारे यांनी यशाचा मार्ग खडतर असला तरी सातत्यपूर्ण अभ्यास आणि मेहनतीमुळे ध्येय गाठता येते, असे सांगितले.  अध्यक्षीय समारोपात बाबासाहेब वरणगावकर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कुलकर्णी यांनी  केले, तर आभार प्रदर्शन ॲड. अमोल बल्लाळ यांनी केले. कार्यक्रमाला शहरातील मान्यवर, गुणवंत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथपाल नेमिनाथ सातपुते, श्रीकांत कुलकर्णी, अमोल जाधव, राजगुरे आणि पालकर यांनी पुढाकार घेतला.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!