सामंजस्याने सोडविला शेत रस्त्याचा वाद
मोताळा तहसीलदार सरिता पाटील यांचा पुढाकार

धामणगाव बढे
शेत शिवारातील रस्त्यांचे वर्षानुवर्षाचे वाद न्यायालयात न ताणता आपसातील सामंजस्य, अधिकाऱ्यांचा सकारात्मक दृष्टिकोन व लोकसहभागातून सोडविल्यास आपसातील बंधुभाव टिकून राहतो तसेच वेळेचा व पैशाचा होणारा अपव्यय तसेच मानसिक त्रास टाळता येतो याचाच एक आदर्श वस्तूपाठ मोताळा तहसीलदार सरिता पाटील (खटाळ) यांच्या पुढाकारातून व प्रयत्नातून बघायला मिळाला.
मोताळा तालुक्यातील किन्हाळा येथील एका शेत रस्त्याचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला वाद सामांजसने सोडविण्यात आला आहे. किन्होळा येथील शेतकरी प्रकाश इंगोले व वसंत इंगोले यांच्या मध्ये शेत रस्त्या संदर्भात अनेक वर्षांपासून वाद प्रलंबित होता. मोताळा तहसीलदार सरिता पाटील (खटाळ) यांनी प्रत्यक्ष किन्होळा येथे जाऊन वस्तुस्थिती जाणून घेतली. तसेच सामंजस्याने हा वाद सोडवण्यासाठी पुढाकार घेत दोन्ही बाजूंना सामोपचाराने मार्ग काढण्याचे महत्त्व पटवून दिले. दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांच्या सकारात्मक सहकार्याने आणि सामोपचाराने तसेच गावातील विविध पदाधिकारी व गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीमध्ये या रस्त्याचा वाद सोडविण्यात प्रशासनाला यश आले.
यावेळी प्रामुख्याने तहसीलदार सरिता पाटील (खटाळ), माजी सभापती कैलास गवई, तंटामुक्ती अध्यक्ष विनोद किन्होळकर, पोलीस पाटील प्रदीप वैराळकर, मंडळ अधिकारी धनंजय शेवाळे, ग्राम महसूल अधिकारी मंदा राठोड यांचे सह गावातील प्रतिष्ठित मंडळी, महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
शेताला रस्ता मिळाल्यामुळे सदर शेतकऱ्यास यावर्षी पेरणी सुद्धा करता आली हे विशेष.



