विठ्ठलभक्तीच्या स्वरांनी भारावले वारकरी भवन
स्वरविहार संगीत विद्यालयाच्या 'स्वरधारा' कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

बुलढाणा
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त स्वरविहार संगीत विद्यालयातर्फे आयोजित ‘स्वरधारा – गजर विठ्ठल नामाचा’ हा भक्ती संगीताचा कार्यक्रम शनिवारी (२५ जुलै) सायंकाळी स्थानिक जगद्गुरू संत तुकाराम महाराज वारकरी भवन येथे भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. विठ्ठलनामाच्या गजराने आणि सुरेल भक्तिगीतांनी संपूर्ण सभागृह भक्तिरसाने भारावून गेले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्येष्ठ संगीतज्ञ अरविंद टाकळकर, त्वचारोगतज्ज्ञ डॉ. विवेक इंगळे आणि योगांजली महिला योग वर्गाच्या संचालिका अंजली परांजपे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी आषाढी एकादशीचे महत्त्व आणि संगीताच्या माध्यमातून भक्तीपरंपरा जपण्याची गरज अधोरेखित केली. स्वरविहार संगीत विद्यालयाच्या विद्यार्थी आणि कलाकारांनी विठ्ठलभक्तीने ओतप्रोत भरलेली अभंग, भक्तिगीते आणि नामसंकीर्तन सादर करून उपस्थित रसिकांची मने जिंकली. कार्यक्रमात डॉ. निलेश जाधव, डॉ. मिलिंद जाधव, डॉ. विवेक इंगळे, डॉ. गजेंद्र निकम, डॉ. रविंद्र गोफणे, डॉ. मंजुश्री खोब्रागडे, भाग्यश्री टाकळकर, शरदकुमार ठाकूर, अमोल देशपांडे, ज्योती खरे, लता गुर्जर, शिल्पा डाबेराव, विमल काळवाघे, शैला हिवाळे, राजश्री उबाळे, मंजुषा जाधव, लक्ष्मी सुरोशे, मंदा मानसकर, वैशाली मुंदे, संतोषी झाल्टे, शीला नाफडे, प्रिया गोफणे, नीलम श्रीवास्तव, शारदा कदम, आदित्य गोफणे, प्रसेनजित मोरे, आर्यन सरोदे, यशवर्धन काकस आणि कु. रेवा सोनूने यांनी सादरीकरण केले. या संगीत मैफिलीसाठी अमोल दिशागज, निषाद टाकळकर आणि प्रकाश खरे यांनी वाद्यसाथ केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वरविहार संगीत विद्यालयाचे संचालक प्रा. रविकिरण मोरे यांनी केले. स्वागत समारंभाचे सूत्रसंचालन रविकिरण टाकळकर यांनी, तर भक्ती संगीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली मोरे यांनी केले. आभार प्रदर्शन प्रसेनजित मोरे यांनी केले.
कार्यक्रमाचा समारोप ज्येष्ठ संगीतज्ञ अरविंद टाकळकर यांच्या सुरेल भैरवीने झाला. या भक्तीमय स्वरसोहळ्यास बुलढाण्यातील संगीतप्रेमी व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



