वारंवार खंडित वीजपुरवठ्याविरोधात युवक काँग्रेस आक्रमक

समस्या न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

 धामणगाव बढे

मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथे वारंवार खंडित होणारा व कमी दाबाने होणारा वीजपुरवठा नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असून, या प्रश्नावर तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव अमर राजीव कुळे यांनी केली आहे.

 यासंदर्भात महावितरणच्या मोताळा कार्यालयात उपमुख्य अभियंत्यांची भेट घेऊन परिसरातील वीज समस्यांबाबत सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात वारंवार होणारी वीज खंडितता, कमी दाबाने होणारा पुरवठा, ट्रान्सफॉर्मरच्या तांत्रिक अडचणी, मीटर रीडिंगमधील त्रुटी, वाढीव वीजबिले तसेच स्मार्ट मीटरसंदर्भातील तक्रारींचा समावेश करण्यात आला. धामणगाव बढे हे परिसरातील प्रमुख व्यापारी केंद्र असल्याने सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा व्यापारी, लघुउद्योजक आणि शेतकऱ्यांवर थेट परिणाम होत आहे. यामुळे व्यवसायाचे आर्थिक नुकसान होत असून विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर तसेच नागरिकांच्या दैनंदिन जीवनावरही विपरीत परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. महावितरणने तातडीने उपाययोजना करून वीजपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा परिसरातील नागरिकांच्या सहभागातून लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आला.

यावेळी नारायण चौधरी, शिवाजी राहणे, दीपक जाधव, रामचंद्र राहणे, हर्षवर्धन राहणे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे उपकरणांचे नुकसान

धामणगाव बढे व परिसरात अनेकदा कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने घरगुती व व्यावसायिक विद्युत उपकरणांचे नुकसान होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. फ्रिज, टीव्ही, पंखे, पाण्याच्या मोटारी, संगणक आदी उपकरणे वारंवार बिघडत असून नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे वीजदाब नियमित ठेवण्यासाठी आवश्यक तांत्रिक उपाययोजना करून कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनातील प्रमुख मागण्या

महावितरणकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनात धामणगाव बढे येथील वीजपुरवठा नियमित करणे, कमी दाबाची समस्या दूर करणे, ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढविणे, मीटर रीडिंगमधील त्रुटी दुरुस्त करणे, वीजबिलांवरील तक्रारींचे तातडीने निराकरण करणे तसेच स्मार्ट मीटरसंदर्भातील नागरिकांच्या अडचणी दूर करण्याची मागणी करण्यात आली. तसेच समस्या कायम राहिल्यास जनआंदोलनाचा इशाराही देण्यात आला.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!