प्रभाकंवरजी म. सा. जन्मशताब्दी महोत्सव सोहळा उत्साहात पडला पार
साध्वीजींच्या मंगल उपस्थितीत वरघोडा; ७१ जणांचे रक्तदान, १६ समाजबांधवांची आठ दिवसांची तपस्या

लोणार
: जैन समाजाचे श्रद्धास्थान प.पू. प्रभाकंवरजी म. सा. यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त लोणार येथे विविध धार्मिक, सामाजिक आणि सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. प.पू. किरणसुधाजी म. सा., प.पू. विशालप्रभाजी म. सा., प.पू. श्री सुयशप्रज्ञाजी म. सा. आणि प.पू. सौम्यप्रज्ञाजी म. सा. यांच्या मंगल उपस्थितीत जन्मशताब्दी महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम नुकतेच शहरातील श्रीमंगल कार्यालय येथे पार पडला.
यावेळी शहरातून वर घोड्याचे आयोजन करण्यात आले होते. धीरज भवन येथून सुरू झालेला वरघोडा हा शहरातील विविध भागातून काढण्यात आला. यात गेलडा भवन, प्रताप चौक, डोंगरवाल चौक, बस स्टँड चौक मार्गे श्री मंगल कार्यालय असा मार्ग निवडण्यचात आला होता. यावेळी मार्गात विविध ठिकाणी जैन समाजबांधव तसेच नागरिकांनी साध्वीजींचे आणि वरघोड्याचे उत्स्फूर्त स्वागत केले. श्री मंगल कार्यालय येथे वरघोड्याच्या समारोपानंतर धार्मिक प्रवचन, गुणगौरव सोहळा आणि स्वामीवात्सल्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला लोणारसह बुलढाणा जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील विविध भागांतील जैन समाजबांधव, लोकप्रतिनिधी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी महोत्सवाला केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, माजी आमदार संजय रायमुलकर, शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव प्रकाशभाऊ मापारी, शिवसेना जिल्हाप्रमुख बळीराम मापारी, लोणारच्या नगराध्यक्ष मीराताई भूषण मापारी, नगरसेवक भूषण मापारी, काँग्रेस नेते नितीन शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या स्मिता मापारी, पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष गोपाल तोष्णीवाल यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
प्रभाकंवरजींच्या छायाचित्राचे पोस्टल तिकीट काढण्याची मागणी
प.पू. प्रभाकंवरजी म. सा. यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदन साद करण्यात आले. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या या निवेदनात प.पू. प्रभाकंवरजी म. सा. यांचे छायाचित्र असलेले विशेष पोस्टल तिकीट जारी करण्याची मागणी करण्यात आली.
१६ समाजबांधवांची आठ दिवसांची तपस्या
जैन धर्मपरंपरेत तपस्येला विशेष महत्त्व असून जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त लोणार येथील १६ समाजबांधवांनी आठ दिवस अन्नत्याग करून तपस्या केली. यामध्ये सौ. सुरेखाजी सुरेशचंद बेदमुथा, सौ. अनिताजी नवलचंदजी चोरडिया, सौ. सपनाजी रौशनजी गेलडा, सौ. कोमलजी ऋषभजी गेलडा, सौ. आरती राजेशजी छाजेड, सौ. जयाजी प्रवीणजी कोचेटा, कु. वीरती आशीषजी गुगलिया, सौ. मानसी ऋषभजी कोठारी, कु. पायल ललितजी लोढा, सौ. मानसीजी कोचेटा, श्री ऋषभजी पारसमलजी कोठारी, डॉ. सिद्धार्थजी विजयजी बैदमुथा, श्री जिनेंद्रजी नवलचंदजी चोरडिया, श्री सिद्धम रौशनजी गेलडा, श्री गौरवजी संदीपजी कुचेरिया आणि श्री आयुष शरदजी लुनिया यांचा समावेश आहे.
जीनेश्वर युवा ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर
जन्मशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने लोणार येथील जीनेश्वर युवा ग्रुपच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण ७१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी जीनेश्वर युवा ग्रुपच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.




