लोणारच्या धारेच्या पाण्यावरून प्रशासन विरुद्ध पालिका संघर्ष पेटला

ASI व वनविभागाच्या आश्वासनांवर नगरपरिषदेचा सवाल; २५ लाखांचा निधी उपलब्ध, लेखी ‘NOC’ देण्याची मागणी

 

लोणार | विशेष प्रतिनिधी
लोणार सरोवर परिसरातील ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या धारेच्या पाण्याचा प्रश्न आता चांगलाच पेटला असून, नगरपरिषद आणि भारतीय पुरातत्व विभाग (ASI) व वनविभाग यांच्यातील मतभेद उघड झाले आहेत. धारेचे पाणी बाहेर काढण्याच्या मागणीसाठी २१ सप्टेंबर रोजी ‘लोणार सरोवर टीम’ व कमळजा माता भक्तांनी केलेल्या आंदोलनानंतर संबंधित विभागांनी दिलेली आश्वासने ही केवळ वेळकाढूपणाची असल्याचा आरोप लोणार नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
नगरपरिषद कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी ASI आणि वनविभागाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आंदोलनाच्या वेळी ५ हजार लिटर क्षमतेची टाकी व ५ एचपीचा पंप बसवून धारेचे पाणी वर आणण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, धारेच्या पाण्याचा प्रवाह पाहता एवढ्या क्षमतेच्या पंपाने प्रश्न सुटणार नसल्याचा दावा नगरपरिषदेने केला.

 

  • ‘५ एचपीचा पंप म्हणजे धूळफेक’
    नगरपरिषद पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, धारेतून येणाऱ्या पाण्याचा ओघ हा १० एचपी क्षमतेच्या पंपापेक्षाही अधिक आहे. त्यामुळे ५ एचपीचा पंप आणि ५ हजार लिटरची टाकी उभारण्याची योजना प्रत्यक्ष परिस्थितीला धरून नसल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलनानंतर जनतेचा रोष शांत करण्यासाठी तात्पुरती उपाययोजना सुचविण्यात आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
  • २५ लाखांचा निधी उपलब्ध; ‘NOC’ द्या, काम आम्ही करतो
    धारेच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी नगरपरिषद तयार असून, केवळ ASI आणि वनविभागाने लेखी नाहरकत प्रमाणपत्र (NOC) देण्याची गरज असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. NOC मिळाल्यास आवश्यक तांत्रिक तसेच बांधकामाची कामे नगरपरिषद स्वतःच्या जबाबदारीवर करण्यास तयार असल्याचे सांगण्यात आले.
    या कामासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, आवश्यकतेनुसार आणखी निधीची व्यवस्था करण्याची तयारी नगरपरिषदेने दर्शविली आहे. त्यामुळे निधी उपलब्ध असताना केवळ विभागीय परवानग्यांअभावी काम रखडत असल्याचा मुद्दा पालिकेने उपस्थित केला.
  • पत्रकार परिषदेला नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक भूषण मापारी, उपाध्यक्ष आबेद खान, गटनेते नितीन शिंदे,शिवसेना पक्षाचे संतोष मापारी, आरोग्य सभापती शेख उबेद, बांधकाम सभापती अनिकेत मापारी, तसेच संतोष मापारी, साहेबराव पवार, गुलाब सरदार, शुभम भगत, जावेद कुरेशी, जमिल कुरेशी, श्याम राऊत, पंढरी चाटे, शिवसेनेचे गजानन मापारी, गजू मापारी, मकसूद शेख, प्रवीण इंगळे आदी उपस्थित होते.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!