मलकापूरात पाणी पेटले!

पालिकेवर काढण्यात आला मोर्चा, नागरिकांनी व्यक्त केला संताप

प्रतिनिधी | मलकापूर,
शहरातील तीव्र होत चाललेल्या पाणीटंचाईविरोधात मलकापूरकरांचा संताप रस्त्यावर उतरला. नियमित व पुरेसा पाणीपुरवठा करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप करत शेकडो नागरिकांनी नगरपालिकेवर मोर्चा काढून जनआक्रोश व्यक्त केला. यावेळी नागरिकांनी घोषणाबाजी करत पाणी प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी केली. सदर मोर्चा मंगळवार १६ जून रोजी काढण्यात आला.
या मोर्चाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते ओम शिंदे यांनी केले. या मोर्चाची सुरुवात शहरातील नूतन विद्यालयाच्या प्रांगणातून करण्यात आला. हा मोर्चा नगरपरिषद कार्यालयावर धडकला यावेळी सुमारे ६०० ते ७०० नागरिक सदर मोर्चात सहभागी झाले. यावेळी नगरपरिषद कार्यालयात झालेल्या सभेमध्ये नगराध्यक्ष अतिक उर रहमान, उपनगराध्यक्ष अनिल गांधी, शिक्षण सभापती अशांत वानखेडे, आरोग्य सभापती राजू पाटील, नगरसेवक ॲड. शाहीद शेख, मुख्याधिकारी संजय केदार तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. मात्र आंदोलन करताना उत्तर देण्यासाठी नगराध्यक्ष खाली उतरलेच नाही. यावेळी नागरिकांनी पाणीपुरवठा व्यवस्थेतील त्रुटी, १४ -१५ दिवसांनी होणारा पाणीपुरवठा, साठवलेल्या पाण्यात निर्माण होणारे जंतू, त्यातून उद्भवणाऱ्या आरोग्य समस्या आणि वाढता आर्थिक भार याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. विशेषतः महिलांनी अत्यंत भावनिक शब्दांत आपली व्यथा मांडत प्रशासनाला जाब विचारला. “रोजगार नाही, पाणी नाही, अशा परिस्थितीत आम्ही जगायचे तरी कसे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नागरिकांच्या प्रश्नांचा भडीमार सुरू असताना प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यामुळे सभागृहातील वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले होते.
मोर्चादरम्यान मुख्याधिकारी संजय केदार यांनी तातडीने उपाययोजनांबाबत लेखी आश्वासन देण्याचे मान्य केल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन स्थगित केले.

अशा होत्या मोर्चातील नागरिकांच्या मागण्या
आंदोलनादरम्यान नागरिकांच्या वतीने नगरपरिषद प्रशासनाला ११ प्रमुख मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये जीर्ण झालेली पाणीपुरवठा व्यवस्था बदलणे, गळती रोखणे, अवैध नळजोडण्या बंद करणे, अमृत योजनेचा निधी उपलब्ध करून घेणे, झोननिहाय पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे, प्रभागनिहाय पाण्याच्या टाक्या उभारणे, एक्स्प्रेस फिडरची क्षमता वाढविणे आणि जॅकवेल व फिल्टर प्लांटचे सक्षमीकरण करणे आदी मागण्यांचा समावेश होता.

नागरिकांच्या संतापापुढे प्रशासनाची दमछाक
पाणी टंचाई मुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी त्यांच्या समस्या अत्यंत आक्रमकपणे मांडल्या. अनेक वर्षांच्या दुर्लक्षामुळे निर्माण झालेला रोष यावेळी स्पष्टपणे दिसून आला. नागरिकांच्या प्रश्नांचा भडीमार आणि आक्रोशामुळे प्रशासनाची चांगलीच दमछाक झाल्याचे चित्र नगरपरिषद कार्यालयात पाहायला मिळाले, या प्रश्नामुळे पालिका प्रशासनाची अक्षरशा बोलती बंद झाल्याचे दिसून आले.

पालिकेने असे दिले लिखित स्वरुपात आश्वासन
यावेळी नगरपरिषद प्रशासनाने या आंदोलनाची अधिकृत दखल घेत सामाजिक कार्यकर्ते ओम शिंदे यांना लेखी स्वरूपात आश्वासन दिले. यात उपलब्ध पाणीसाठा, वितरण व्यवस्था आणि तांत्रिक बाबींचा विचार करून शहरातील पाणीपुरवठ्याचे चक्र १० दिवसांवरून ७ ते ८ दिवसांवर आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार, उपलब्ध निधीचा वापर शहरातील विद्यमान पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम करण्यासाठी करण्यात येणार, याशिवाय, पाणीपुरवठ्याची क्षमता वाढविण्यासाठी नवीन पंप खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून तांत्रिक मान्यता, निविदा प्रक्रिया व स्थापनेची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी अंदाजे चार महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. नवीन पंप कार्यान्वित झाल्यानंतर पाणीपुरवठ्याचे अंतर ५ ते ६ दिवसांपर्यंत कमी करण्यास मदत होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!