आमदार खरात यांची अखेर ‘लोणार विकास समिती’वर नियुक्ती!
आ. खरात आता तरी लोणारकडे लक्ष देणार का?

लोणार
जागतिक किर्ती लाभलेल्या लोणार सरोवर विकास समितीवर अखेर मेहकर-लोणार मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार सिद्धार्थ खरात यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. आमदारांच्या समर्थकांकडून या नियुक्तीचे सोशल मीडियावर जोरदार स्वागत केले जात असले, तरी लोणार तालुक्यातील सामान्य जनतेमध्ये मात्र यावरून तीव्र संभ्रम आणि आक्रमक नाराजीचा सूर उमटत आहे. “आमदार साहेब, आता तरी लोणारकडे मेहकरसारखे लक्ष देणार की येथील परिस्थिती ‘आहे तशीच’ वाऱ्यावर सोडणार?” असा थेट आणि रोकडा सवाल आता सामान्य लोणारकरांमधून उपस्थित केला जात आहे.
राजकीय वर्तुळात आणि जनतेत सध्या एकच चर्चा सुरू आहे की, आमदार सिद्धार्थ खरात यांचे संपूर्ण प्रेम फक्त मेहकर शहरावरच राहिले आहे. मेहकरच्या बस डेपोचे आधुनिकीकरण असो, कोट्यवधींचे अंतर्गत रस्ते असोत की इतर नागरी सुविधा, आमदारांनी तिथे निधीचा पाऊस पाडला मात्र, त्या तुलनेत जागतिक पर्यटनाचा दर्जा आणि युनेस्को (UNESCO) मानांकनासाठी प्रस्तावित असलेल्या लोणार शहराला नेहमीच दुय्यम स्थान मिळाले. आमदारांचे सर्व लक्ष मेहकरवर केंद्रित असल्याने लोणारचा विकास गेल्या अनेक महिन्यांपासून संथ गतीने आणि ढिम्म प्रशासकीय कारभारात अडकला गेल्याचा थेट आरोप नागरिक करत आहेत. लोणार सरोवराच्या पाण्याच्या पातळीत अलीकडे कमालीची वाढ झाली आहे. या वाढत्या जलपातळीमुळे सरोवराच्या काठावरील अनेक प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत, ज्याकडे आमदार खरात यांनी स्वतः विधिमंडळात लक्ष वेधले होते .याशिवाय, शहरातील ठप्प पडलेली १०६ कोटींची भूमिगत गटार योजना, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) आणि पर्यटनाची झालेली कमालीची दुरवस्था यांमुळे स्थानिक व्यावसायिक आणि नागरिक प्रचंड त्रस्त आहेत. यापूर्वीही केवळ बैठकांचा फार्स आणि आश्वासनांची खैरात झाली, मात्र प्रत्यक्षात जमिनीवर कोणतेही मोठे काम दिसले नाही.
४३४ कोटींचा निधी; आता कागदी घोडे नकोत!
शासनाने लोणारच्या पुनरुज्जीवनासाठी आणि पर्यटनासाठी ४३४.६२ कोटी रुपयांच्या सुधारित जतन व विकास आराखड्याला प्रशासकीय मंजुरी दिली आहे, ज्याचा ‘ॲक्शन टेकन रिपोर्ट’ थेट मुख्यमंत्री कार्यालयाने मागवला आहे .आजवर लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे आणि शासकीय विभागांमधील समन्वयाच्या अभावामुळे हा निधी योग्य ठिकाणी खर्च होऊ शकला नाही. आता आमदार खरात स्वतः या उच्चस्तरीय विकास समितीवर अधिकृत सदस्य म्हणून नियुक्त झाले आहेत. त्यामुळे आता त्यांना प्रशासनाकडे बोट दाखवून कोणतीही सबब सांगता येणार नाही.
जनतेची राहणार करडी नजर!
आमदार सिद्धार्थ खरात यांनी केवळ बैठका घेऊन कागदी घोडे न नाचवता, मेहकरसारखाच कामाचा धडाका आता लोणारमध्येही दाखवावा. सरोवराचे संवर्धन, ऐतिहासिक मंदिरांचे जतन आणि पर्यटकांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करण्याचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, असे खुले आव्हान लोणारकरांनी दिले आहे. आमदारांची ही नियुक्ती लोणारच्या विकासाला खरोखरच नवी दिशा देणार की हा केवळ एक राजकीय स्टंट ठरणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



