पंढरपूर वारीतील 7 वारकऱ्यांना ट्रकने चिरडले

पुणे
. आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांवर आज सकाळी मोठा अनर्थ ओढावला. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत पायी चालत निघालेल्या वारकऱ्यांना जेजुरी परिसरातील भोंगळे मळा येथे एका भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून, चार वारकरी गंभीर जखमी झाले आहेत.
सध्या राज्यभरातून लाखो वारकरी ऊन-पावसाची तमा न बाळगता पायी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडचा मुक्काम आटोपून आज जेजुरीच्या दिशेने मार्गस्थ झाली होती. सकाळच्या वेळी अनेक वारकरी जेजुरीच्या दिशेने पायी चालत निघाले होते. या मार्गावर सुरक्षेच्या कारणास्तव एकाच बाजूने वाहने सोडली जात होती.
प्राथमिक माहितीनुसार, जेजुरी नजीकच्या भोंगळे मळा परिसरात मागून आलेल्या एका भरधाव ट्रकने वारकऱ्यांच्या टेम्पोला आणि पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की यात तब्बल सहा वारकरी चिरडले गेले. अपघात घडताच परिसरातील नागरिक आणि इतर वारकऱ्यांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले. जखमी झालेल्या सर्व सहा वारकऱ्यांना तातडीने नजीकच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान यापैकी तीन महिला वारकऱ्यांचा उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर उर्वरित तीन जखमी वारकऱ्यांवर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांचीही प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.



