पावसाळ्यातील आजारांना रोखण्यासाठी जिल्हाभर राबवणार जनजागृती मोहीम

जिल्हा परिषद स्टॉप डायरिया अभियान ३१ जुलै पर्यंत राबवणार

  •  बुलडाणा,

पावसाळ्यात दूषित पाणी, अस्वच्छता आणि वैयक्तिक स्वच्छतेच्या अभावामुळे अतिसारजन्य आजारांचा धोका वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद बुलडाणा यांच्या वतीने ‘स्टॉप डायरिया अभियान ’ प्रारंभ करण्यात आले आहे. सदर अभियान हे ३१ जुलै पर्यत राबवले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी दिली.
अतिसार हा विशेषतः पाच वर्षांखालील बालकांसाठी गंभीर आणि जीवघेणा ठरू शकणारा आजार असल्याने त्याच्या प्रतिबंधासाठी सुरक्षित पिण्याचे पाणी, साबणाने नियमित हात धुणे, परिसराची स्वच्छता राखणे आणि स्वच्छतेच्या योग्य सवयी अंगीकारणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करून अतिसारजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आरोग्य विभाग, ग्रामपंचायत, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा यंत्रणा तसेच विविध सामाजिक संस्थांच्या समन्वयातून हे अभियान राबविण्यात येणार आहे. अभियानांतर्गत तालुका व ग्रामस्तरावर विशेष बैठका आयोजित केल्या जाणार आहेत. ग्रामपंचायती, पाणीपुरवठा व स्वच्छता समित्या, शाळा आणि अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. गावनिहाय पाणी गुणवत्तेची तपासणी करून सर्व पाणी स्रोतांची नियमित चाचणी घेतली जाईल. तसेच विद्यार्थी आणि स्वयंसेवकांना फिल्ड टेस्ट किटद्वारे पाणी तपासणीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. ग्रामीण पाणीपुरवठा व्यवस्थेतील गळती दुरुस्त करणे, पाणी साठवण टाक्यांची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करणे, तसेच पिण्याच्या पाण्याचे नियमित क्लोरीनीकरण करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. नळाद्वारे पुरवठा होणाऱ्या पाण्यात किमान ०.२ पीपीएम मुक्त अवशिष्ट क्लोरीन राखण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. याशिवाय हात धुण्याचे महत्त्व, सुरक्षित पाणी वापर, अन्न स्वच्छतेचे नियम आणि अतिसार प्रतिबंधक उपाय याबाबत व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत हागणदारीमुक्त गावांची स्थिती कायम राखण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
सदर अभियान स्थानिक नागरिक, स्वयंसेवी संस्था, ग्रामपंचायत सदस्य व विविध विभागांच्या सहभागातून अभियान यशस्वी करण्यावर भर दिला जाणार असून, पाणी गुणवत्तेशी संबंधित तक्रारींचा नियमित आढावा घेऊन सुरक्षित पाणीपुरवठ्यासाठी तत्काळ कार्यवाही केली जाईल. या अभियानात सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि सेवाभावी संस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी केले आहे.

 

अतिसार रोखण्यासाठी स्वच्छतेची सवय महत्त्वाची
पावसाळ्यात दूषित पाणी आणि अस्वच्छतेमुळे अतिसारजन्य आजारांचा धोका वाढतो. विशेषतः लहान मुलांमध्ये हा आजार गंभीर स्वरूप धारण करू शकतो. त्यामुळे नागरिकांनी उकळलेले किंवा शुद्ध केलेले पाणी पिणे, जेवणापूर्वी व शौचानंतर साबणाने हात धुणे, अन्नपदार्थ झाकून ठेवणे आणि परिसर स्वच्छ राखणे आवश्यक आहे. अतिसाराची लक्षणे आढळल्यास तातडीने आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

गावागावांत पाणी तपासणीसह जनजागृती
‘स्टॉप डायरिया अभियान २०२६’ अंतर्गत जिल्हाभरात पाणी गुणवत्तेची तपासणी, पाणी साठवण टाक्यांची स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि नियमित क्लोरीनीकरणावर भर दिला जाणार आहे. शाळा, अंगणवाडी केंद्रे, ग्रामपंचायती आणि पाणीपुरवठा समित्यांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये सुरक्षित पाणी वापर, हात धुण्याचे महत्त्व आणि अतिसार प्रतिबंधाबाबत व्यापक जनजागृती केली जाणार आहे. विविध विभाग आणि सामाजिक संस्थांच्या सहभागातून हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.

प्रतिबंध हाच पर्याय, नागरिकांनी सहभागी व्हावे
सुरक्षित पाणी, स्वच्छता आणि चांगल्या सवयींच्या माध्यमातून अतिसारमुक्त व निरोगी बुलडाणा घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा. प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय असून नागरिकांच्या सह‌कार्यामुळे हे अभियान अधिक प्रभावी ठरेल
– सतीश देशमुख, प्रकल्प संचालक जल जीवन मिशन जिल्हा परिषद बुलढाणा.

00

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!