अखेर आरोपींना ठोकल्या पोलिसांनी बेड्या

वीस दिवस पोलिसांचा घाम काढणारा खून उघडकीस

मनीष अग्रवाल | पुणे

चाकण येथे एका नातेवाईक महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधातून निर्माण झालेला संशय आणि त्यातून होणारा सततचा त्रास अखेर एका तरुणाच्या निर्घृण खुनाचे कारण ठरल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. चाकण उत्तर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बिरदवडी गावच्या स्मशानभूमीमागील ओढ्याजवळ आढळलेल्या अनोळखी मृतदेहामागील रहस्य तब्बल २० दिवसांच्या अथक तपासानंतर उघडकीस आले.

या प्रकरणात मुंजा धोंडीबा नरहिरे (वय २५, रा. गंगाखेड, जि. परभणी) याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी निखिल नानासाहेब चव्हाण (वय २१, रा. खराबवाडी, ता. खेड, मूळ रा. काथनेश्वर, जि. परभणी), त्याची आई उषा नानासाहेब चव्हाण (वय ४०, रा. गंगाखेड, जि. परभणी) तसेच स्वप्नील नरहरी पारधी (वय १९, रा. खराबवाडी, ता. खेड, मूळ रा. ढोकी, जि. नांदेड) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिस उपायुक्त मारुती जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जानेवारी रोजी अंदाजे २५ ते ३० वयोगटातील एका तरुणाचा मृतदेह निर्जन ठिकाणी आढळून आला होता. मृताच्या डोक्यावर धारदार हत्याराने वार करण्यात आले होते. ओळख पटू नये म्हणून त्याचा चेहरा दगडाने विद्रूप करण्यात आला होता. तसेच मृताच्या खिशातील मोबाइल व ओळखपत्रही काढून नेण्यात आले होते.

घटनास्थळी सापडलेल्या दारू व पाण्याच्या बाटल्या तसेच तीन सिगारेटच्या ठिपक्यांवरून पोलिसांना संशयितांचा माग काढता आला. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. तसेच इन्स्टाग्रामवरील एका प्रोफाइलवर संशयितांची दुचाकी आढळून आली. दुचाकीच्या मालकाशी संपर्क साधल्यानंतर संशयित तरुणांची नावे समोर आली.

उत्तर चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने संशयितांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर मृतदेह मुंजा नरहिरे याचाच असल्याचे तपासात स्पष्ट झाले.

या धडाकेबाज कारवाईमुळे २० दिवसांपासून गूढ बनलेला खुनाचा गुंता अखेर सुटला असून, चाकण उत्तर पोलिसांच्या तपासकार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!