तितरची भाजी कच्ची दिल्याने तिघांनी हॉटेल पेटविले
सीसीटीव्ही मुळे अडकले आरोपी

प्रतिनिधी | बुलडाणा,
खामगाव ते अकोला मार्गावरील टेंभुर्णा फाटयावर असलेल्या चांगभलं नावाच्या हॉटेल मालकाने ग्राहकांना पार्सल मध्ये तितरची भाजी दिली. सदर भाजी ही कच्ची निघाली, या गोष्टीचा राग धरुन तिघांनी सदर मालकाचे हॉटेल पेटवले. परिसरातील सीसीटीव्ही वरुन या प्रकरणी तिघा विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना नुकतेच घडली.
मिळालेल्या माहितीनुसार टेंभुर्णा परिसरातील रहिवासी योगेश शिवाजीराज जाधव वय ४०, यांने टेंभूर्णा येथील कुसूम सोळंकी यांच्या शेतातील जागा भाडयाने घेवून चांगभलं नावाचे हॉटेल सुरु केले होते. दरम्यान या ठिकाणी टेंभुर्णा येथील रहिवासी आरोपी ओम टीकार, शुभम टीकार व नयन टीकार हे तिघे आले व त्यांनी योगेश जाधव यास तितरची भाजी पार्सल करुन देण्यास सांगितले. रात्रीची वेळ असल्याने हॉटेल मालक जाधव यांने गरबडीत सदर भाजी पार्सल दिली व दुकानाला कुलूप लावून घरी परत निघाले. यावेज्ळी आरोपीनी जाधव यास भेटून सदर भाजी कच्ची असल्याचे सांगितले. त्यावर जाधव यांनी भाजीचे पैसे परत देतो, किंवा भाजी पुन्हा बनवून देतो असे सांगितले. यावर समाधान न झाल्याने जाधव व टीकार यांच्यात चांगलाच वाद झाला. यावेळी परिसरातील नागरिकांनी दोघांना घरी पाठवले. मध्यरात्रीच्या दरम्यान परिसरातील नागरिकांनी फा ेन करुन जाधव यांना सांगितले की, हॉटेल ला आग लागली आहे. याची माहिती मिळताच जाधव व इतर मित्रांनी तत्काळ घटनास्थळी भेंट देवून आगीवर नियंत्रण मिळवले. दुसऱ्या दिवशी सकाळी परिसरात लावलेल्या सीसीटीव्हीची पडताळणी केली असता त्यात भाजी कच्ची असली असा आरोप करणारे तिघे आरोपी हॉटेलला आग लावत असल्याचे अाढळून आले.
या प्रसंगी योगेश जाधव यांच्या तक्रारीवरुन ओम टीकार, नयन टीकार व शुभम टीकार या तिघावर खामगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.



