लोणारात ट्रकचालकाकडून  कायद्याच्या नाकावर टिच्चून रेती तस्करी

 रेती तस्करांनी थेट नंबर प्लेट्स केल्या गायब

लोणार,

रेती तस्कर सातत्याने वेगवेगळी शक्कल लढवत आहे. आता तर पोलिस व महसूल विभागापासून बचाव करण्यासाठी थेट तस्करांनी  वाहनांच्या नंबर प्लेटसोबत उघडपणे छेडछाड सुरू केली आहे. काही गाड्यांवर चिखल फासला आहे, काहींच्या नंबर प्लेट्स वाकवल्या आहेत, तर अनेक गाड्या चक्क विना-नंबर प्लेटच्या लोणारच्या मुख्य रस्त्यांवरून उजळ माथ्याने धावत आहेत. हा सर्व प्रकार रेती तस्कर कायद्याच्या  नाकावर टिच्चून राजरोसपणे करत आहे.

लोणार परिसरातील नद्या आणि ओढ्यांमधून रात्रीच्या अंधारात हजारो ब्रास रेतीचा बेकायदेशीर उपसा केला जातो. त्यानंतर क्षमतेपेक्षा तिप्पट (Overload) रेती भरलेली ही अवजड वाहने रात्रीपासून ते पहाटेपर्यंत रस्त्यांवरून सुसाट वेगाने धावतात. तपासणी दरम्यान जर चुकून एखाद्या अधिकाऱ्याने यांना जाब विचारला, तर “रात्रीच्या वेळी चिखलातून गाडी आली, म्हणून नंबर दिसत नाही,” अशी उलटी उत्तरे देऊन हे तस्कर अधिकाऱ्यांनाच दमदाटी करतात. कायद्याची भीती पूर्णपणे संपल्यामुळे हे माफिया आता रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनधारकांनाही जुमानत नाहीत.  सर्वसामान्य नागरिकाने दुचाकीला फॅन्सी नंबर प्लेट लावली किंवा हेल्मेट घातले नाही, तर वाहतूक पोलीस तत्परतेने हजारो रुपयांचा दंड फाडतात. मात्र, दुसरीकडे डोळ्यांसमोरून नंबर प्लेट गायब करून फिरणाऱ्या या मृत्यूच्या दूत बनलेल्या रेती वाहनाकडे पोलीस जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहेत. उद्या जर या विना-नंबरी वाहनांनी एखाद्या निष्पाप नागरिकाला चिरडले, तर पोलीस तपास कसा करणार? अपघात करून पळून गेलेल्या वाहनाचा शोध कसा लागणार? हा अत्यंत गंभीर प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

‘मलिदा गँग’ सक्रिय? वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष

लोणार तालुक्यातील या उघड बेकायदेशीर प्रकाराला स्थानिक महसूल आणि पोलीस प्रशासनातील काही ‘काळ्या मेंढ्यांचे’ अर्थपूर्ण अभय असल्याचा थेट आरोप नागरिक करत आहेत. जोपर्यंत महिन्याचा ठरलेला ‘हप्ता’ आणि मलिदा पोहोचतो, तोपर्यंत या गाड्यांचे विद्रूप झालेले नंबर पोलिसांना दिसतच नाहीत, अशी संतप्त चर्चा चौकाचौकात सुरू आहे. आता या प्रकरणात बुलढाण्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक स्वतः लक्ष घालून लोणारमधील या ‘नंबर प्लेट घोटाळ्याची’ चौकशी करणार का? की तस्करांना अशीच खुली सूट दिली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!