बुलडाणा,
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तसेच वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी वृक्ष आणि वनसंवर्धन अत्यंत महत्त्वाचे असून यासाठी लोकसहभागाची गरज असल्याचे प्रतिपादन उपवनसंरक्षक जमीर शेख यांनी केले.
बुलडाणा वन विभागाच्यावतीने नुकतीच नियुक्ती झालेल्या मानद वन्यजीव रक्षकांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन वन विभाग कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी आयोजित चर्चासत्रात जिल्ह्यातील वनसंरक्षण, वृक्षलागवड आणि जनजागृतीसंदर्भातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना जमीर शेख यांनी अवैध वृक्षतोड रोखण्यासाठी जनजागृती करणे गरजेचे असल्याचे सांगितले. सदर कार्यक्रम नुकतेच पार पडला.
दरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते पुढे म्हणाले की, झाडे ही पर्यावरण संतुलन राखणे, पावसाचे प्रमाण टिकवणे, मृदा संरक्षण तसेच वन्यजीवांचे अस्तित्व सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी नमूद केले. अवैध वृक्षतोडीमुळे जैवविविधतेवर परिणाम होऊन पक्षी व वन्यजीवांच्या अन्नसाखळीवरही विपरीत परिणाम होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विनापरवाना वृक्षतोड करणे हा कायद्याने गुन्हा असून प्रत्येक नागरिकाने वृक्षसंवर्धनाची सामाजिक जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहनही त्यांनी केले. गावपातळीवर वनसंवर्धन समित्या, शाळा आणि विविध संस्थांच्या माध्यमातून जनजागृती वाढविण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. परिसरात कुठेही अवैध वृक्षतोड आढळल्यास तात्काळ वन विभागाला माहिती देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमात मानद वन्यजीव रक्षकपदी निवड झाल्याबद्दल डॉ. वैशाली निकम आणि सचिन कापुरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी किटक तज्ज्ञ अलोक शेवडे, पक्षीमित्र डॉ. गजेंद्र निकम, सर्पमित्र विनय कुलकर्णी यांच्यासह वन विभागाचे अधिकारी सुनील वाकोडे आणि स्वप्निल पवार उपस्थित होते.