डॉ. राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसीत गुणवंत प्राध्यापकांचा सन्मान; संशोधनासाठी त्रिपक्षीय सामंजस्य करार

मलकापूर
इंदिरा बहुउद्देशीय शिक्षण संस्था (IBSS), बुलढाणा संचलित डॉ. राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी, मलकापूर येथे नुकताच विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. योगेंद्रजी गोडे यांनी महाविद्यालयाला भेट देत प्राध्यापकांच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव केला. यावेळी संशोधन व कौशल्य विकासाला चालना देणाऱ्या त्रिपक्षीय सामंजस्य कराराची (MoU) देवाणघेवाणही पार पडली.
कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत देशमुख आणि सहयोगी प्राध्यापक डॉ. रितेश रमेश पोपट यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच संशोधन आणि कौशल्य विकासाच्या दृष्टीने ‘बीआरआयसी-आयबीएसडी, इम्फाळ’ आणि ‘थिनक्र टेक्नॉलॉजीज प्रा. लि.’ यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात आला. दरम्यान कार्यक्रमात कर्करोग संशोधन क्षेत्रातील योगदानाबद्दल आणि ‘टॉप ५ टक्के जागतिक शास्त्रज्ञ’ म्हणून मान्यता मिळाल्याबद्दल प्राचार्य डॉ. प्रशांत देशमुख यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. त्यांनी कर्करोग उपचार आणि औषधनिर्माण क्षेत्रात केलेल्या संशोधनाची दखल विविध स्तरांवर घेतली जात आहे. याशिवाय, ‘डिझाईन, डेव्हलपमेंट अँड इव्हॅल्युएशन ऑफ अँटी-इन्फ्लेमेटरी ड्रग्स बाय क्रिस्टली-को-अॅग्लोमरेशन टेक्निक’ या विषयावर पीएच.डी. प्राप्त केल्याबद्दल डॉ. रितेश पोपट यांचाही सत्कार करण्यात आला. त्यांच्या या शैक्षणिक यशामुळे महाविद्यालयाच्या संशोधन परंपरेत आणखी भर पडली आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बीआरआयसी-आयबीएसडीचे प्रभारी संचालक डॉ. नानौचा शर्मा यांचे आभार मानण्यात आले. तसेच संस्थेचे अध्यक्ष योगेंद्र गोडे, सचिव तन्वी गोडे यांच्या मार्गदर्शनाचा विशेष उल्लेख करण्यात आला. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संशोधन आणि कौशल्य विकासासाठी नवे पाऊल
डॉ. राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी, मलकापूर, बीआरआयसी-आयबीएसडी (इम्फाळ) आणि थिनक्र टेक्नॉलॉजीज प्रा. लि. यांच्यात झालेल्या त्रिपक्षीय करारामुळे विद्यार्थी आणि प्राध्यापकांना शैक्षणिक देवाणघेवाण, संयुक्त संशोधन प्रकल्प, अत्याधुनिक प्रयोगशाळांचा वापर तसेच तांत्रिक प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. या कराराअंतर्गत जैवसंसाधन, औषधनिर्माण आणि शाश्वत विकास या क्षेत्रांमध्ये संयुक्त उपक्रम राबविण्यात येणार असून विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासासाठी कार्यशाळा, चर्चासत्रे आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. उद्योग आणि शिक्षण क्षेत्र यांच्यातील दुवा म्हणून थिनक्र टेक्नॉलॉजीज महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या सामंजस्य कराराची देवाणघेवाण प्राचार्य डॉ. प्रशांत के. देशमुख आणि बीआरआयसी-आयबीएसडी, इम्फाळ येथील वैज्ञानिक डॉ. भरत जी. सोमकुवर यांच्या हस्ते करण्यात आली. थिनक्र टेक्नॉलॉजीजचे मुख्य परिचालन अधिकारी (COO) डॉ. शितल कुमार झांबड यांनी उद्योग क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत करारावर स्वाक्षरी केली.



