वैभवी जाधवची विदर्भ क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी; इंडिया वॉरियर्स संघाला व्हीपीएल 2026 चे विजेतेपद

बुलडाणा,
विदर्भ क्रिकेट असोसिएशन (VCA) अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या व्हीपीएल 2026 स्पर्धेत तरोडा येथील सरपंच प्रवीण जाधव यांची कन्या वैभवी जाधव हिने उल्लेखनीय कामगिरी करत क्रिकेट क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. वैभवीची निवड इंडिया वॉरियर्स संघात झाली होती. तिच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर इंडिया वॉरियर्स संघाने संपूर्ण स्पर्धेत दमदार प्रदर्शन करत व्हीपीएल 2026 च्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. VPL 2026 ही विदर्भ क्रिकेट असोसिएशनची प्रमुख स्पर्धा असून यामध्ये विविध संघांनी सहभाग नोंदविला होता.
अंतिम सामन्यात इंडिया वॉरियर्स संघाने सर्व विभागांत उत्कृष्ट खेळ करत प्रतिस्पर्धी संघावर मात केली. या विजयामुळे संघाने प्रतिष्ठेचा व्हीपीएल चषक उंचावत 2026 हंगामाचे चॅम्पियन होण्याचा मान पटकावला. विजयानंतर संघातील सर्व खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. संघाच्या यशामध्ये वैभवी जाधव हिचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. स्पर्धेदरम्यान तिने सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. तिच्या उत्कृष्ट खेळाची दखल घेत तिला सुवर्णपदक (गोल्ड मेडल) प्रदान करण्यात आले. या यशामुळे तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दरम्यान बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड यांनी वैभवी यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार केला.
यावेळी आमदार संजय गायकवाड, सभापती गणेश बस्सी, प्रवीण जाधव, श्रीकृष्ण शिंदे, रोहित गवळी, भिमराज पाटील, विजय दुरणे व कार्यकर्ते उपस्थित होते.




