केनवडलाच प्रस्तावित अप्पर तहसील व्हावे; सरपंच निताताई गोळे, ग्रामस्थांची मागणी 

 

केनवड

रिसोड तालुक्यातील केनवड येथे प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालयाची प्रक्रिया सुरू झाली असून, सदर कार्यालय अन्यत्र न करता केनवड येथेच कायम ठेवण्यात यावे, अशा ठाम मागणीचा ठराव सरपंच तथा प्रशासक निताताई गणेशराव गोळे यांच्या नेतृत्वात घेण्यात आला आहे. तसेच समस्त केनवड महसूल मंडळातील ग्रामस्थांनी यासंदर्भात आज तहसीलदार, रिसोड यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना याबाबतचे निवेदन सादर केले आहे.

केनवड हे रिसोड तालुक्यातील सर्वच दृष्टीने महत्त्वाचे, विकसित व मध्यवर्ती गाव असून परिसरातील १५ ते २० गावांसाठी ते प्रमुख प्रशासकीय, शैक्षणिक, आरोग्य व व्यापारी केंद्र म्हणून ओळखले जाते. गावामध्ये भारतीय स्टेट बँक, अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, बुलढाणा अर्बन मल्टीस्टेट बँक, महाराष्ट्र अर्बन बँक यांच्यासह विविध पतसंस्था कार्यरत आहेत. याशिवाय सेतू सुविधा केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, पोस्ट कार्यालय, महावितरण कार्यालय, तलाठी कार्यालय, नाफेड व इतर खरेदी केंद्रे, कृषी सेवा केंद्रे, पेट्रोल पंप, केंद्रीय जिल्हा परिषद शाळा, उर्दू शाळा, वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालये, व्यापारी प्रतिष्ठाने, मंगल कार्यालये तसेच आठवडी बाजार अशा विविध शासकीय व नागरी सुविधा येथे उपलब्ध आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांची दैनंदिन शासकीय व आर्थिक कामे मोठ्या प्रमाणात केनवड येथेच पार पडतात. केनवड ग्रामपंचायत ही तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक आहे. तरीदेखील महसूल विभागाशी संबंधित विविध कामांसाठी केनवड महसूल मंडळातील तसेच परिसरातील नागरिकांना आजही सुमारे ३५ ते ४० किलोमीटर अंतर पार करून रिसोड येथे जावे लागते. यामुळे शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि सर्वसामान्य नागरिकांचा वेळ, पैसा व श्रम यांचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असल्याच्या ग्रामस्थांच्या भावना आहेत. विशेष म्हणजे केनवड हे गाव जिल्हा व तालुक्याच्या सीमावर्ती भागात असून राज्य महामार्गालगत वसलेले आहे. येथे शासकीय जागा तसेच शासकीय इमारत उपलब्ध असल्यामुळे अप्पर तहसील कार्यालय कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सोयीसुविधा आणि प्रशासकीय सुलभतेचा विचार करता प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालयाचे मुख्यालय केनवड येथेच कायम ठेवणे अधिक योग्य ठरेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

 

महाराष्ट्र शासनाचा उद्देश महसूल व प्रशासकीय सेवा नागरिकांच्या दारात आणि त्यांच्या जवळच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा आहे. त्याच उद्देशाने केनवड येथे प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले आहे. त्यामुळे लोकहिताचा विचार करून हा निर्णय कायम ठेवावा आणि कार्यालय अन्यत्र स्थलांतरित करू नये, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!