मलकापूर तालुक्यात धर्मवीर युथ फाउंडेशनचा विस्तार; पाच गावांत नव्या शाखांचे उद्घाटन

मलकापूर,
मलकापूर तालुक्यात धर्मवीर युथ फाउंडेशनच्या संघटनात्मक विस्ताराला वेग आला असून लोणवाडी, जांभूळधाबा, आळंद, खामखेड आणि देवधाबा या पाच गावांमध्ये फाउंडेशनच्या नव्या शाखांचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या उपक्रमाला स्थानिक युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिला.
शाखा उद्घाटनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ढोल-ताशांचा गजर, भगवे ध्वज आणि युवकांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. प्रत्येक गावात झालेल्या कार्यक्रमातून सामाजिक ऐक्य, युवक संघटन आणि जनसेवेचा संदेश देण्यात आला. धर्मवीर युथ फाउंडेशनचे कार्य बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच फाउंडेशनचे अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात सुरू असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या कार्यक्रमादरम्यान अनेक युवकांनी फाउंडेशनमध्ये प्रवेश करत सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार व्यक्त केला.
फाउंडेशनच्या माध्यमातून युवकांमध्ये सामाजिक उत्तरदायित्वाची भावना निर्माण करणे, गावपातळीवरील विविध प्रश्नांकडे लक्ष वेधणे, शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक आणि आपत्कालीन सेवांमध्ये योगदान देणे तसेच राष्ट्रहिताच्या उपक्रमांमध्ये युवकांचा सहभाग वाढविणे, हा संस्थेचा प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. तालुक्यातील विविध गावांमधून युवकांचा वाढता सहभाग लक्षात घेता फाउंडेशनची संघटनात्मक ताकद वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या माध्यमातून गावोगावी समाजाभिमुख उपक्रमांना चालना मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला प्रत्येक गावातील शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, शाखा संघटक, सचिव, सोशल मीडिया प्रमुख, फाउंडेशनचे पदाधिकारी, सदस्य आणि मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते. उपस्थितांनी समाजहितासाठी एकजुटीने कार्य करण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाच्या शेवटी युवकांना समाजपरिवर्तन आणि लोकसेवेच्या कार्यात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.



