जखमींच्या मदतीला धावले आमदार संजुभाऊ
राजूर घाटात दोन दुचाकींचा भीषण अपघात: चार गंभीर

बुलढाणा
माणुसकीचा आदर्श घालून देत बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार संजू भाऊ गायकवाड यांनी आज बालाजी मंदिर, राजूर घाट परिसरात झालेल्या भीषण दुचाकी अपघातातील जखमींना वेळेवर मदत करून त्यांच्या जीवाला आधार दिला. अपघातस्थळी क्षणाचाही विलंब न करता दाखवलेल्या तत्परतेमुळे उपस्थित नागरिकांनी आमदार संजुभाऊ गायकवाड यांच्या संवेदनशीलतेचे कौतुक केले.
२८ जुलै २०२६ रोजी मोताळा तालुक्यातील दौरा आटोपून आमदार संजुभाऊ गायकवाड हे बुलढाण्याकडे परत येत असताना बालाजी मंदिर, राजूर घाट परिसरात दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या अपघातात साखळी बु. येथील शांताराम सोनुने तसेच मोताळा तालुक्यातील थड येथील अमोल निंबाळकर, अजय कुसळकर आणि परमेश्वर कुसळकर हे गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर जखमी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वेदनेने तडफडत पडलेले होते.
घटनेचे गांभीर्य ओळखून आमदार गायकवाड यांनी तात्काळ आपले वाहन थांबवून जखमींकडे धाव घेतली. त्यांनी प्रत्येक जखमीची विचारपूस केली, त्यांच्या दुखापतींची पाहणी केली आणि स्वतःच्या हाताने डोक्याला तसेच हात-पायाला रुमाल बांधून रक्तस्राव थांबविण्याचा प्रयत्न केला. रुग्णवाहिकेची वाट न पाहता त्यांनी तत्काळ आपल्या खाजगी वाहनासह रस्त्यावरील इतर वाहनांचीही मदत घेत जखमींना तातडीने बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.
याचवेळी आमदार संजुभाऊ गायकवाड यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक दत्तात्रय बिराजदार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून जखमींना त्वरित आणि सर्वोत्तम वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. त्यांच्या सूचनेनुसार रुग्णालय प्रशासनाने तातडीने उपचार प्रक्रिया सुरू केली.
यावेळी नितीन सुपे, अजय खोत, संतोष जाधव, योगेश मुळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, धर्मवीर युथ फाऊंडेशनचे पदाधिकारी तसेच परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




