शेगाव-वरवट संपर्क तुटला
संततधार पावसाचा परिणाम; शेगाव ग्रामीण पोलिसांचा घटनास्थळी बंदोबस्त

शेगाव
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेगाव परिसरातील नद्या-नाल्यांना पूर आला आहे. वरवट ते शेगाव मार्गावरील पुल ही पाण्याखाली आल्याने सध्या शेगाव – वरवटचा संपर्क तुटल्याची माहिती आहे.
शुक्रवारी पहाटे सुमारे ३ वाजल्यापासून कालखेड येथील लहान पुलावरून पाणी वाहू लागल्याने शेगाव-वरवट मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. पुलाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पाण्याचा वेग अधिक असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव वाहनचालकांना प्रवास थांबवून पाण्याची पातळी कमी होण्याची प्रतीक्षा करावी लागली. घटनेची माहिती मिळताच शेगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बंदोबस्त तैनात केला. नागरिकांनी कोणताही धोका पत्करून पुल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, तसेच पाण्याचा प्रवाह पूर्णपणे कमी झाल्यानंतरच पुढील प्रवास करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.
साईड बॉक्स : पावसाळ्यात घ्या ही काळजी
पूर आलेल्या पुलावरून किंवा रस्त्यावरून वाहन नेण्याचा अथवा पायी जाण्याचा प्रयत्न करू नका. प्रशासन व पोलिसांच्या सूचनांचे पालन करा. पाण्याचा वेग आणि खोलीचा अंदाज न आल्याने अपघाताची शक्यता वाढते. आवश्यक असल्यास पर्यायी मार्गाचा वापर करावा किंवा पाणी ओसरेपर्यंत सुरक्षित ठिकाणी थांबणे हाच सर्वोत्तम पर्याय आहे.



